नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड जानेवारी २०१८ मध्ये ग्राहकांना धक्का देणार आहे. त्यामुळे जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जानेवारीआधी केलेली बरी.
कंपनी जानेवारी २०१८ मध्ये आपल्या सर्वच मॉडल्सच्या किंमतीत २ टक्क्यांनी वाढ करण्याच्या विचारात आहे. वाढत्या इनपुट कॉस्टमुळे ही किंमत वाढण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वॄत्तानुसार, कंपनी हॅचबॅक अल्टो ८०० पासून यूटिलीटी व्हेईकल एस-क्रॉसपर्यंत गाड्या विकते. ज्यांची किंमती २.४५ लाख रुपयांपासून ते ११.२९ लाख रूपयां(एक्स शोरूम दिल्ली) पर्यंत आहे.
कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ‘सध्या बारीकसारिक गोष्टी आम्ही स्वत:च अॅडजस्ट करत आलो आहोत. पण आता कमोडीटीच्या मूल्यात वाढ झाल्याच्या कारणाने याचा बोझा आम्हाला ग्राहकांवर टाकावा लागणार आहे. पुढील महिन्यापासून कंपनीच्या सर्वच मॉडल्सच्या किंमतीत साधारण २ टक्क्यांनी वाढ होणार आहे. वेगवेगळ्या मॉडल आणि त्यांच्या फ्यूल स्पेशिफिकेशननुसार त्यांच्या किंमतीत वाढ केली जाईल’.
दरम्यान, टाटा मोटर्सने सुद्धा इनपुट कॉस्ट वाढल्याने पुढील महिन्यापासून आपल्या पॅसेंजर गाड्यांच्या किंमतीत २५ हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा अॅन्ड महिंद्रा सुद्धा जानेवारी २०१८ पासीन आपल्या गाड्यांच्या किंमतीत १.५-२ टक्के वाढ करणार आहे. टोयोता किर्लोस्कर मोटरने ३ टक्के, होंडा कार्स इंडियाने १-१२ टक्के आणि स्कोडा ऑटो इंडियाने २-३ टक्के किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे.