Maruti Alto 2022 Launch: मारुति सुझुकीच्या अल्टो कारनं दोन दशकाहून अधिक काळ कारप्रेमींच्या मनावर राज्य केलं आहे. 20 वर्षांच्या कालावधी उलटला तरी या गाडीची क्रेझ कमी झालेली नाही. कंपनीने काळानुरूप यात बदल करत अपडेटेड मॉडेल लाँच केले आहेत. या गाडीकडे एक बजेट कार म्हणूनही पाहिलं जातं. सर्वसामान्यांचा विचार करत कंपनीने ही गाडी बाजारात आणली होती. भारतात आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी ही गाडी विकत घेतली आहे. त्यामुळे कारप्रेमींमध्ये अपडेटेड वर्जनबाबत कायम उत्सुकता असते. Maruti Alto 2022 च्या नव्या मॉडेलमध्ये काय फीचर्स आहेत, याबाबत कुतुहूल आहे. त्यामुळे ही गाडी कधी लाँच होणार याबाबत चर्चा सुरु असतानाच कंपनीने तारीख जाहीर केली आहे. मारुती सुझुकी जन्माष्टमीला ग्राहकांना नव्या गाडीची भेट देणार आहे. कंपनी 18 ऑगस्ट रोजी आपल्या अल्टोचा नवीन अवतार सादर करणार आहे.
नवीन इंजिन पर्याय आणि उत्तम मायलेजसह मारुती सुझुकी आपली नवीन अल्टो लॉन्च करणार आहे. हे 1-लिटर पेट्रोल इंजिन आणि स्वयंचलित मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) पर्याय असेल. येथे आम्ही तुम्हाला 5 पॉइंट्समध्ये कारशी संबंधित तपशील समजावून सांगणार आहोत.
1. लूक: नवीन अल्टोचे काही फोटो लीक झाले आहेत. फोटोनुसार, कार स्टीलच्या रिम्ससह येईल आणि बॉडी-कलर्ड डोर हँडलसह काळ्या रंगाचे ORVM मिळतील. नवीन अल्टोची लांबी 3,530 मिमी, रुंदी 1,490 मिमी आणि उंची 1,520 मिमी असणे अपेक्षित आहे.
2. इंजिन: नवीन अल्टोमध्ये 1 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन सध्याच्या 800 सीसी मोटरची जागा घेईल. नवीन इंजिन 66 बीएचपी पॉवर आणि 8 एनएम टॉर्क देऊ शकते. इंजिनला पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन युनिटशी जोडले जाऊ शकते. नवीन अल्टो देखील चांगले मायलेज देईल असे बोलले जात आहे.
3. व्हेरियंट: नवीन मारुती सुझुकी अल्टो सात प्रकारांमध्ये येऊ शकते. यामध्ये STD, LXi, LXi (O), VXi, VXi (O), VXi+ आणि VXi+ (O) यांचा समावेश आहे.
4. फीचर्स: नवीन मारुती अल्टोमध्ये पार्किंग सेन्सर्स, ड्युअल एअरबॅग्ज, कॅमेरा, हाय-स्पीड अलर्ट, सीटबेल्ट रिमाइंडर आणि चाइल्ड सीट अँकर मिळतील.
5. अपेक्षित किंमत: अल्टो ही कंपनीची सर्वात स्वस्त हॅचबॅक आहे. सध्या त्याची किंमत 3.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. नवीन लुक आणि नवीन फीचर्स असलेली अल्टो 4 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल, असं बोललं जात आहे.