मुंबई : इन्स्टाग्रामवर (Instagram) छान छान रील्स म्हणजे शॉर्ट व्हिडिओज पाहायला कुणाला आवडत नाहीत? भारतात टिकटॉकवर (TikTok) बंदी आल्यापासून इन्स्टा रील्स चांगलेच फेमस झालेत. पण लवकरच हे शॉर्ट व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. कारण इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकनं अर्थात मेटा कंपनीनं इन्स्टाग्रामचं सबस्क्रिप्शन मॉडेल लाँच करण्याचे संकेत दिले आहेत.
इन्टाग्राम सबस्क्रिप्शन (subscription) अॅप सध्या आयफोनच्या अॅप स्टोअरवर प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे पेड अॅप वापरण्यासाठी युजर्सना महिन्याला 89 रुपये भरावे लागतील. रील्स क्रिएटर्सना एक्सक्लुझिव्ह कंटेंट तयार करण्यासाठी त्याची मदत होईल. यातून क्रिएटर्सना कंटेंटसाठी चांगला मोबदला मिळेल. तर युजर्सना चांगल्या दर्जाचा एक्सक्लुझिव्ह कंटेंट पाहायला मिळेल. यातून इन्स्टाग्रामला देखील आर्थिक फायदा होईल
या नव्या सबस्क्रिप्शन फिचरबाबत इन्स्टाग्रामनं अधिक तपशील जाहीर केलेला नाही. सध्या फ्री अॅपवरील जाहिरातींच्या माध्यमातून इन्स्टाग्राम आणि फेसबुकला सर्वाधिक उत्पन्न मिळतं. ही फ्री अॅप्स यापुढंही सुरूच राहतील. पण त्याजोडीला जाहिरात फ्री असलेल्या सबस्क्रिप्शन मॉडेलला भारतीय युजर्स पसंती देतील का, हा मोठा प्रश्न आहे..