मुंबई : टेलीकॉम कंपनी आयडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आयडिया लवकरच त्यांचं नाव बदलणार आहे. यासाठी कंपनीनं २६ जूनला विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. व्होडाफोन आणि आयडियाचं मर्जर झाल्यामुळे आयडिया कंपनीचं नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आयडिया ही आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी आहे. व्होडाफोनसोबत मर्जर झाल्यानंतर कंपनीचं नाव 'व्होडाफोन आयडिया लिमिटेड' करावं, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मर्जर झाल्यानंतर तयार होणारी नवीन कंपनी देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी होईल. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आयडियानं २६ तारखेला बैठक बोलावली आहे.
कुमार मंगलम बिर्ला हे आयडिया कंपनीचे मालक आहेत. कंपनीनं २६ जूनला होणाऱ्या बैठकीची माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. या बैठकीत कंपनीचं नाव बदलण्याबाबत चर्चा होईल. तसंच नॉन कनव्हर्टिबल डिबेंचर्सच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपये जमा करण्याबद्दलचा विचारही बैठकीत होईल.
देशातली दुसरी सगळ्यात मोठी कंपनी व्होडाफोन आणि तिसरी मोठी कंपनी आयडिया यांचं मर्जर शेवटच्या टप्प्यात आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजमध्ये नवीन सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्परेशन आल्यानंतर कंपनीचं नाव बदलून 'व्होडाफोन आयडिया लिमिटेड' होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DoT)कडूनही या मर्जरला अंतिम मंजुरी मिळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कंपनीत व्होडाफोनकडे ४५.१ टक्के, आदित्य बिर्ला ग्रुपकडे २६ टक्के आणि आयडिया शेअरधारकांकडे २८.९ टक्के हिस्सा असेल. नवीन कंपनीकडे पहिल्या दिवसापासून जवळपास ४३ कोटी मोबाईल सबस्क्रायबर्स असतील.
कंपनीचं नाव बदलल्यानंतर आयडिया आणि व्होडाफोनचे ग्राहक नवीन कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे ग्राहक बनतील. नवीन कंपनीची ऑफर आणि नवीन प्लानचा फायदा ग्राहकांना मिळेल. याचबरोबर जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी कंपनी ग्राहकांसाठी नवे प्लानही घेऊन येऊ शकते.