तुम्हीपण क्लिक करता का I Am Not A Robot वाला बॉक्स? का द्यावा लागतो माणूस असल्याचा पुरावा?

How Does I Am Not A Robot Works: आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी एखादी वेबसाईट अ‍ॅक्सेस करण्याआधी I Am Not A Robot हा पर्याय क्लिक केला असेल. पण हा पर्याय का क्लिक करावा लागतो? युझर्सला हा पर्याय का दाखवला जातो तुम्हाला ठाऊक आहे का?

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 4, 2023, 03:18 PM IST
तुम्हीपण क्लिक करता का I Am Not A Robot वाला बॉक्स? का द्यावा लागतो माणूस असल्याचा पुरावा? title=
अनेकदा वेबसाईटवर प्रवेश देण्याआधी हा पर्याय क्लिक करावा लागतो

How Does I Am Not A Robot Works: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात इंटरनेट (Internet) ही अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. काही देशांनी इंटरनेटचा वापर ही मूलभूत गरज असल्याचंही स्वीकारलं आहे. इंटरनेटच्या याच वाढत्या वापरामुळे त्यावर अवलंबून राहणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. खास करुन 'गुगल'सारख्या (Google) सेवांवर तर अनेकजण अवलंबून असतात. अगदी छोट्या मोठ्या गोष्टींपासून ते इंटरनेट सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठीही किबोर्डवर पहिल्यांदा बोट चालतात तेव्हा गुगलचं टाइप होतं. गुगलच्या माध्यमातून कोट्यवधी वेबसाईट्सला व्हिजीट करता येते. मात्र यापैकी काही वेबसाईटवर प्रवेश करण्याआधी अनेकदा साईट वापरणारा युझर हा मानव असल्याचा पुरावा द्यावा लागतो. म्हणजेच या वेबसाईटचा वापर करण्याआधी I Am Not A Robot या पर्यायावर टीक करावं लागतं. पण हा पर्याय युझर्सला का दाखवला जातो? त्याचा नेमका अर्थ तरी काय? यामागील नेमकं लॉजिक काय असतं? असे प्रश्न अनेकदा तुम्हालाही पडले असतील याच प्रश्नांची उत्तरं देणारा एक जुना व्हिडीओ सध्या पुन्हा चर्चेत आला आहे.

हा पर्याय क्लिक केल्यावर नेमकं काय होतं?

I Am Not A Robot हा पर्याय आणि पुढे टीक बॉक्स दिसल्यानंतर आपल्यापैकी जवळजवळ सर्वचजण त्यावर क्लिक करतात. अनेकांचा यासंदर्भातील समज असा आहे की गुगल कंप्युटरच्या माऊसच्या हलचालीवरुन साईट वापरणारी व्यक्ती मानव आहे की रोबोट हे ओळखतो. मात्र हा समज चुकीचा असून यामागील कारण फारच वेगळं आहे. ज्या क्षणी कोणताही युजर I Am Not A Robot पर्याय क्लिक करतो त्याच क्षणी ती वेबसाईट युजर्सच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीचा डेटा मिळवतो. म्हणजेच या साईटवर येण्यापूर्वी संबंधित युजरने नेमक्या कोणकोणत्या वेबसाईट पाहिल्या आहेत याची माहिती ही वेबसाईट मिळवते. 

तो व्हिडीओ झाला व्हायरल

सोशल मीडियावर बीबीसीचा एका जुन्या क्विज शोमधील व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये I Am Not A Robot हा पर्याय नेमका कसा काम करतो यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. I Am Not A Robot वर क्लिक केल्यानंतर संबंधित वेबसाईट युजरच्या ब्राऊजर हिस्ट्रीमधील सर्व डेटा तपासून पाहतो. तुम्ही यापूर्वी काय काय काम केलं आहे, काय सर्च केलं आहे यावरुन कंप्युटर युजर हा मानव आहे की रोबोट हे ठरवतो, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.

म्हणजेच अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर I Am Not A Robot वर क्लिक करणं हे आपली खासगी माहिती या वेबसाईटबरोबर शेअर करण्यासारखंच आहे.