मुंबई : दुचाकी वाहन बनविणारी देशातील आघाडीची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्प पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात आणण्याच्या विचार करत आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. इलेक्ट्रिक वाहनाबद्दल कंपनी उत्साहित आहे. यासाठी ते जयपूर (राजस्थान) आणि स्टीफनस्कीर्चेन (जर्मनी) मधील आर अँड डी केंद्रात स्वतःचे उत्पादन तयार करण्याच्या विचारात आहे.
याव्यतिरिक्त, कंपनीने तैवानच्या गोगोरो इंक सह करार केला आहे. ही भागीदारी ताइवान कंपनीची बॅटरी इंटरचेंज सिस्टम भारतात आणण्यासाठी तयार आहे. या भागीदारी अंतर्गत या दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन विकासात सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
हीरो मोटोकॉर्पचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निरंजन गुप्ता यांनी विश्लेषकांशी बोलताना सांगितले की, "2021-22 मध्ये आम्ही इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमचे स्वतःचे उत्पादन किंवा गोगोरो यांच्या समवेत एकत्र प्रोडक्ट आणू शकतो."
दुचाकी उत्पादन करणार्या कंपनीने या क्षेत्राचा उपयोग करण्यासाठी यापूर्वी बंगळुरूमध्ये ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) स्टार्टअप अॅथर एनर्जीमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीने यापूर्वीच बाजारात प्रोडक्ट लॅान्च केला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपनीच्या रणनीतीबाबत गुप्ता म्हणाले की, जर्मनी आणि जयपूरमधील कंपनीचे आर अँड डी केंद्र निश्चित चार्जिंग सिस्टमवर आधारित उत्पादने विकसित करण्याचे काम करत आहेत. ते म्हणाले की, दुसरीकडे गोगोरो भागीदारी अंतर्गत आम्ही स्वॅपिंग सिस्टमकडे लक्ष देत आहोत.
गुप्ता म्हणाले, "आमचा विचार आहे की, दोन्ही कंपन्या एकत्र काम करतील. मागणी आणि उपलब्ध पायाभूत सुविधा मिळाल्यास आमचा स्वतःचा प्रोग्राम स्टॅटिक चार्जिंगवर आधारित असेल आणि गोगोराबरोबर आम्ही इंटरचेंज सिस्टमच्या मॉडेलवर काम करू. याद्वारे आम्ही दोन्ही क्षेत्रात काम करू शकू. "
एका प्रश्नाचे उत्तर देताना गुप्ता म्हणाले की, "या महामारीचा कंपनीन्या उत्पादन सादर करण्याच्या योजनेवर परिणाम झाला नाही. आम्हाला नवीन योजना आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टींच्या योजनेची गरज आहे, ते सगळे आम्ही वेळेनुसार करत आहोत. हीरो मोटो कॉर्पने 2020-21 या आर्थिक वर्षात 58 लाख मोटारसायकली आणि स्कूटरची विक्री केली आहे.