Harley Davidson Bikes : इंधनाचे वाढते दर पाहता सध्याच्या घडीला चारचाकी वाहन असल्यास ते इलेक्ट्रीक किंवा सीएनजी वर्जनमध्ये आणि बाईक असल्यास तिसुद्धा इलेक्ट्रीक वर्जनमध्ये खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. काळाची गरज आणि अर्थातच आर्थिक गणिताला केंद्रस्थानी ठेवत असे निर्णय घेतले जातात. तुम्हीही येत्या काळात एखादी बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात का? काय म्हणता, तुम्हालाही इलेक्ट्रीक वाहनच खरेदी करायचंय? मग, ही माहिती तुमच्यासाठीच.
आता थोडे आणखी पैसे साठवा आणि एकदाच एक दमदार इलेक्ट्रीक बाईक घ्या. कारण, अशी संधी वारंवार येणं नाही. हार्ले डेव्हिडसनची इलेक्ट्रीक बाईक आता भारतात लाँच होत आहे. हार्लेचं लाईव्ह वायर हे मॉडेल भारतात येण्यास सज्ज झालं आहे. अर्थात इथं किंमत थोडी जास्तच आहे. बाईकप्रेमी आणि त्यातूनही रायडिंगचा थरार आवडत असणाऱ्यांसाठी ही बाईक परवणी ठरणार आहे. उपलब्ध माहितीनुसार या बाईकची भारतातील किंमत 20 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे.
हार्लेच्या इलेक्ट्रीक बाईकची बॉडी कास्ट अॅल्युमिनियम फ्रेमनं तयार करण्यात आली आहे. यामध्ये रिअर मोनोशॉकसोबत बिग पिस्टन फोर्स मिळत असून, तो तुम्ही गरजेनुसार अॅडजस्ट करु शकत आहात. शिवाय या बाईकला 300 मिमी ट्विन डिस्कही देण्यात आले आहेत. ही बाईक 104.6 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करत असून 116 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. अवघ्या 3.5 सेकंदांमध्ये ही बाईक 0 ते 100 किमी प्रति तास इतका वेग पकडले. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार एकदा चार्ज केल्यास ही बाईक 235 किमीचं अंतर ओलांडते. या अफलातून फिचर्समुळं हे हार्लेचं हायकेट मॉडेल म्हटलं जात आहे.
येत्या 8 ते 10 महिन्यात विविध बाईक कंपन्यांची साधारण 20 इलेक्ट्रीक मॉडेल्स देशात लाँच होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं हार्लेशिवाय तुमच्यापुढं टीव्हीएस, कायनॅटीक, होंडा, हिरो, सुझुकी, व्हेस्पा, एलएमएल या बड्या कंपन्यांच्या बाईकचे पर्याय असणार आहेत. यामध्ये होंडा अॅक्टिव्हाचं इलेक्ट्रीक व्हर्जनही लक्षवेधी ठरणार आहे.
बड्या कंपन्यांशिवाय स्विच सीएसआर, झिरो एसआरय, लायगर एक्स, गोगोरो या स्टार्टअप्सच्याही बाईक लवकरच लाँच होणार आहेत. त्यामुळं काही नवे पर्याय एक्सप्लोअर करण्याची संधी बाईकप्रेमींना मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रीक बाईक घेण्याचा कल कमालीचा वाढला आहे. एकट्या मे महिन्यात देशात तब्बल 1 लाख इलेक्ट्रीक बाईकची विक्री झाली. पण, जून महिन्यात ही संख्या एकदम 46 हजारांपर्यंत खाली आली. पण, पावसाळ्यात इलेक्ट्रीक बाईक खरेदीकडे तुलनेत पाठ फिरवली जाते, त्याचा हा परिणाम असावा असं मानलं जातंय. देशात इलेक्ट्रीक बाईकची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात होताना दिसत आहे.