मोबाईल जीमेलने कात टाकली, नव्या फिचर्ससह सुटसुटीत रचना

ईमेल करण्यासाठी जीमेलचा वापर करत नाही, अशा व्यक्ती अगदी नगण्य आहेत.

Updated: Jan 31, 2019, 08:59 AM IST
मोबाईल जीमेलने कात टाकली, नव्या फिचर्ससह सुटसुटीत रचना title=

नवी दिल्ली - ईमेल करण्यासाठी जीमेलचा वापर करत नाही, अशा व्यक्ती अगदी नगण्य आहेत. जीमेलचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी असून, त्यामध्ये वाढच होते आहे. आता जीमेलने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी ईमेलच्या मोबाईलवरील रुपात बदल केले आहेत. मोबाईलवरून मेल पाठविणाऱ्यांची आणि बघणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली असल्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईलवरील जीमेल अधिक सुटसुटीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर नवे फिचर्सही सुरू करण्यात आले आहेत. 

मोबाईलवरील जीमेलच्या नव्या डिझाईनमध्ये आता मेलसोबत आलेले ऍटॅचमेंट लगेचच पाहता येतील. त्यासाठी तो मेल उघडण्याचीही गरज पडणार नाही. त्याचबरोबर मेल उघडल्यावर आधी संपूर्ण मजकूर वर सरकून मग ऍटॅचमेंट बघावी लागण्याची गरज उरणार नाही. ग्राहक अगदी सहजपणे ऍटॅचमेंट उघडून बघू शकतील. गुगलचे प्रॉडक्ट मॅनेजर निकोलस रे यांनी ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून याची माहिती दिली. जीमेलवरील वैयक्तिक आणि कामासाठीचे मेल यामधील फरक अधिक नेमकेपणाने नव्या डिझाईनमध्ये दिसेल. त्यामुळे महत्त्वाचे मेल ग्राहकांना पटकन दिसतील आणि त्यावर आवश्यकतेनुसार उत्तरही देता येईल. एखादा मेल बनावट किंवा तुमच्या माहितीची चोरी करण्यासाठी पाठविण्यात आला असल्याचे दिसल्यास मोबाईलमध्येही यापुढे तुम्हाला सावध करण्यात येईल. त्यासाठी डेस्कटॉपवरील जीमेलमध्ये लाल रंगात जसा ऍलर्ट येतो. त्याचप्रमाणे आता मोबाईलमध्येही ऍलर्ट येईल. जेणेकरून तुमची फसवणूक टाळली जाईल.

डेस्कटॉपवरील जीमेलमध्ये विविध नवे फिचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गुगल ड्राईव्ह, कॅलेंडर, गुगल डॉक्स यामध्येही अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. लवकरच या सर्व सुधारणा मोबाईलमध्येही देण्यात येतील, असे निकोलस रे यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये ऍंड्राईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या ग्राहकांपर्यंत जीमेलमधील नवीन फिचर्स पोहोचतील. त्याचबरोबर डिझाईनमध्ये करण्यात आलेले बदलही दिसतील, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी केवळ जीमेल ऍप अपडेट करून घ्यावे लागणार आहे.

Tags: