PPT बनवून कमवते 16 कोटी रुपये; कोट्यधीश होण्याचा तिचा प्रेरणादायी अन् हटके प्रवास

Freelancer Earns Over Rs 16 Crore PowerPoint Presentations: कॉलेमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती काही वर्ष ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करत होती. मात्र नंतर तिने फ्रिलाइन्सिंग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 16, 2023, 10:36 AM IST
PPT बनवून कमवते 16 कोटी रुपये; कोट्यधीश होण्याचा तिचा प्रेरणादायी अन् हटके प्रवास title=
पीपीटी बनवण्याचं कौशल्य वापरुन झाली कोट्यधीश (फोटो लिंक्डइनवरुन साभार)

Women Earns Over Rs 16 Crore PowerPoint Presentations: वर्किंग क्लासमध्ये दोन प्रकार आपल्याला पहायला मिळतात. एक 9 ते 5 जॉब करणारे आणि दुसरे फ्रिलाइन्सिंग करणारे. असं म्हणतात की फ्रिलाइन्सिंग करणाऱ्या लोकांचा संख्या भविष्यात अनेक पटींनी वाढणार आहे. अनेकजण 9 ते 5 नोकरी सोडून आपल्या कौशल्याच्या जोरावर पोटं भरतील असा एक अंदाज मांडला जातो. बरं सध्या जे फ्रिलाइन्सिंग करतायत त्यांच्याकडे आणि त्यांनी मिळवलेल्या यशाकडे पाहून लवकरच हे होईल असं दिसत आहे. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक आहे कोर्टनी ऍलन!

पीपीटी करुन जगणार का? अनेकांनी हिणवलं

खरं तर कॉर्परेट जग हे पॉवर पॉइण्ट प्रेझेन्टेशनवरच चालतं असंही मस्करीत म्हटलं जातं. मात्र हा विषय केवळ मस्करीपुरता न ठेवता कोर्टनी ऍलन याचमधून कोट्यधीश झाली आहे. कोर्टनी ऍलन करते काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर उत्तर अगदी सोपं आहे, ती पॉवर पॉइण्ट प्रेझेन्टेशन्स बनवून देते. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील अटलांटा येथील वास्तव्यास असलेली कोर्टनी ऍलनने ग्राफिक्स डिझायनर म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. मात्र थोड्याच वेळात तिला आपल्याला पॉवर पॉइण्ट प्रेझेन्टेशन फार छान जमतं आणि हे करायला आपल्याला आवडतं असं जाणवलं. आपल्याला अनेकजण तू जगण्यासाठी केवळ पॉवर पॉइण्ट पेझेन्टेशन करणार का असा प्रश्न विचारल्याचं कोर्टनी ऍलनने सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 

2 वर्षांत सुरु केली स्वत:ची PPT बनवणारी कंपनी

कॉलेजमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्ष कोर्टनी ऍलन कॉन्ट्रॅक्टवर ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करायची. तिने सिस्कोसारख्या कंपनीसाठी काम केलं. यावेळी तिने अनेक प्रेझेन्टेशन्सही केले. त्यानंतर 2015 मध्ये कोर्टनी ऍलनने अपवर्कसारख्या वेबसाईटवरुन फ्रिलान्सर म्हणून कामं शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2 वर्षांमध्ये म्हणजेच 2017 मध्ये कोर्टनी ऍलनने केवळ पीपीटी बनवून देणारी आपली वेगळी कंपनीच सुरु केली. कंपनी सुरु केल्याच्या एका वर्षामध्येच तिला फार मोठ्या प्रमाणात कामं मिळाली. तिने तिच्या कंपनीचं नावं 16x9 असं ठेवलं. तिच्या कंपनीने एकूण 2 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 16 कोटींचा बिझनेस केला आहे. आपला हा प्रवास फार खडतर होता असं कोर्टनी ऍलनने सांगितलं.

अनेक बड्या कंपन्या तिच्या क्लायंट लिस्टमध्ये

कोर्टनी ऍलनला पहिल्यांदा सॉफ्टवेअर बनवणाऱ्या अडॉर्ब कंपनीकडून कंत्राट मिळालं. त्यानंतर येल्प कंपनीचंही कंत्राट कोर्टनी ऍलनला मिळालं. ऑगस्ट 2016 मध्ये कोर्टनी ऍलन पाच आकडी कमाई करु लागली आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. विशेष म्हणजे ब्लूमबर्ग, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही आता तिच्या क्लायंट लिस्टमध्ये आहेत. कोर्टनी ऍलनची गोष्ट खरोखर प्रेरणादायी आहे. आपल्याकडे कौशल्य असेल तर आपण त्याच्या जोरावरही उदर्निवाह करु शकतो हेच कोर्टनी ऍलनच्या यशामधून दिसून येतं.