मुंबई : रिलायन्स जिओनं त्यांच्या ग्राहकांना दणका दिला आहे. जिओच्या नियम आणि अटींचं पालन केलं नाही तर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा लिमिटेड होऊ शकते, असा इशारा जिओनं दिला आहे.
सप्टेंबर २०१६मध्ये रिलायन्स जिओनं टेलीकॉम सेक्टरमध्ये पाऊल टाकलं. यावेळी जिओनं अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली. या ऑफरमुळे अनेक ग्राहकांनी जिओचं सीमकार्ड घेतलं. पण अनलिमिटेड कॉलिंगचा होत असलेला दुरुपयोग बघता जिओनं ३०० मिनीटंच फ्री द्यायची तयारी सुरु केली आहे.
हे बदल काही ठराविक यूजर्ससाठीच असणार आहेत. जे ग्राहक अनलिमिटेड कॉलिंगचा गैरफायदा घेत आहेत, त्यांच्यासाठीच ३०० मिनिटाचं लिमिट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक दिवसासाठी हे ३०० मिनिटाचं लिमिट असणार आहे.
जिओचं कार्ड वापरून अनेक जण दिवसाला १० तासांपेक्षा जास्त बोलत आहेत. यामध्ये मार्केटिंग आणि प्रमोशनल कॉलचाही वापर होत आहे. जिओचा हा गैरवापर रोखण्यासाठी अशा ग्राहकांना ३०० मिनीटंच फ्री देण्यात येणार आहेत. फ्री कॉलिंगची सुविधा ही फक्त वैयक्तिक वापरासाठी आहे. त्याचा व्यावसायिक वापर होत असेल तर अशा ग्राहकांवर ३०० मिनिटाचं लिमिट जिओ टाकणार आहे.