दीपाली जगताप-पाटील, झी २४ तास, मुंबई : देशभरात सध्या चर्चा सुरू आहे ती चौकीदारावर... 'चौकीदार चोर है' आणि 'मैं भी चौकीदार' या दोन मोहिमेवरुन सध्या समाज माध्यमांवर राजकीय युद्ध पेटलंय. स्वत:ला 'चौकीदार' म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' अशी स्लोगन वापरली. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपानंही मग 'मै भी चौकीदार' ही मोहीम सुरू केलीय. पंतप्रधान मोदींसह तमाम मंत्री, खासदार, भाजपाचे मुख्यमंत्री सगळ्यांनीच नावासमोर 'चौकीदार' असा शब्द लावलाय.
त्यामुळेच, सोशल मीडियावर 'चौकीदार' हा शब्द 'टॉप ट्रेंडिंग' राहिला आणि आता 'चौकीदार फिरसे' हा नवा ट्रेंड सुरू झालाय. भाजपाच्या दाव्यानुसार,
- 'मैं भी चौकीदार' या नावाने १२ लाख ट्विटस झालेत
- तर 'मैं भी चौकीदार' या गाण्याचा व्हिडिओ जगभरात १ कोटी प्रेक्षकांनी पाहिलेत
- काँग्रेसच्या 'चौकीदार चोर है' मोहिमेला साधारणपणे २ लाख समर्थकांनी हॅशटॅग वापरलाय
काँग्रेसच्या मोहिमेमुळेच भाजपाला 'मैं भी चौकीदार' मोहीम सुरू करावी लागली, असा आरोप काँग्रेसचा आहे. त्याचबरोबर 'मैं भी चौकीदार' या मोहिमे अंतर्गत करण्यात आलेली ट्विटस ही समर्थकांनी केलेली नसून 'बॉटस' ही संगणकीय प्रणाली वापरुन केल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे. 'बॉटस'प्रणाली वापरुन फेक अकाऊंटवरुन ट्विटसची संख्या वाढलेली दाखवली जाते, असं काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख सपकाळ यांनी म्हटलंय.
माजी मंत्री एम जे अकबर यांनीही नावापुढे 'चौकीदार' लावलं... अकबर यांच्यावर मीटू प्रकरणी लैंगिक अत्याचाराचे आरोप असल्यानं, यावर जोरदार टीका झाली. असा चौकीदार असेल तर देशातल्या महिला असुरक्षित राहतील, असं ट्विट अभिनेत्री रेणूका शाहणे यांनी केलं.
देशात ज्यापद्धतीने तापमान वाढतंय तसंच राजकीय वातावरणही गरम होतंय. सोसल मीडियावर सुरु असलेल्या चौकीदाराच्या खडाजंगीत स्पष्ट आहे की २०१९ चा निवडणुकीचा रणसंग्राम जितका रस्त्यावर रंगणार आहे त्यापेक्षा जास्त तो सोशल मीडियावरही रंगेल.