मुंबई : दुचाकी बनवणारी कंपनी एथर एनर्जीनं मंगळवारी दोन नवीन स्कूटर लॉन्च केल्या. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. या स्कूटर भारतातल्या सगळ्यात महागड्या आहेत. कंपनीनं एथर ४५० आणि एथर ३४० या दोन स्कूटर लॉन्च केल्या. एथर ४५० ची किंमत १,२४,७५० रुपये आणि एथर ३४०ची किंमत १,०९,७५० रुपये आहे. कंपनीनं एथर ४५० शहरी भागात चालवण्यासाठी बनवली आहे. ही स्कूटर ८० किमी प्रती तासाच्या वेगानं चालते. तसंच ४० किमीचा वेग ३.९ सेकंदात पकडते, असा दावा कंपनीनं केला आहे.
सध्या ही स्कूटर बंगळुरूमध्ये प्री-ऑर्डरवर मिळत आहे. स्कूटरच्या किंमतीमध्ये २२ हजार रुपयांची सबसिडी, जीएसटी, रोड टॅक्स, स्मार्ट कार्ड फी, रजिस्ट्रेशन फी आणि इन्श्यूरन्सचा समावेश आहे. आयआयटी मद्रासमध्ये ४ वर्षांपूर्वी ही स्कूटर बनवायला सुरुवात झाली होती.
सध्या ही स्कूटर बंगळुरूमध्येच मिळत असली तरी पुढच्या टप्प्यामध्ये पुणे आणि चेन्नईमध्येही या स्कूटरची विक्री होईल. स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ६० किमीपर्यंत चालू शकते. स्कूटर ८० टक्के चार्ज होण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो. खड्डे असलेल्या रस्त्यावर ही स्कूटर चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा कंपनीनं केला आहे. दोन्ही स्कूटरला फ्रंट आणि रियरमध्ये सीबीएस सिस्टिमसोबत डिस्क ब्रेक देण्यात आलेत.