T-20 World Cup Final : टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तान संघ इंग्लंडकडून पराभूत झाला होता. पाकिस्तान संघाला दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. उपविजेता ठरलेला पाकिस्तान संघावर पाकिस्तान संघाच्याच माजी खेळाडूने निशाणा साधला आहे. झुल्करेन हैदर असं माजी खेळाडूचं नाव आहे.
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान अर्धशतक किंवा शतक झळकावल्यानंतर मैदानावर नमाज अदा करताना दिसला आहे. याचाच धागा पकडत हैदर यांनी फैलावर घेतलं आहे. कुठे गेले तुमचे नमाज?, तुम्ही फायनल का जिंकू शकले नाही?, एक 15 वर तर दुसरा 14 का आऊट झाला. दिखाव्यासाठी नमाज पढला जात नाही, त्याच्यापेक्षा इंग्लंडच्या दोन मुसलमानांनी सर्वांची मन जिंकलीत, ते दोघेही मुसलमान आहेत मात्र ते कधी मैदानात नमाज पढत नाहीत, असं म्हणत झुल्करेन हैदर यांनी पाकिस्तान संघावर निशाणा साधला.
फोटोंमध्ये झळकण्यासाठी नमाज पढला जात नाही. हाशिम आमलाने कधी मैदानावर नमाज अदा केला नाही. कारण तो मैदानाबाहेर चांगला मुसलमान आहे. उलट तुम्ही फायनलमध्ये पोहोचलात याबद्दल अल्लाहचे आभार माना, असंही झुल्करेन हैदर यांनी म्हटलं आहे. हैदर यांनी मोहम्मद रिझवानचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा निशाणा त्याच्यावरच होता.
दरम्यान, पाकिस्तानवर इंग्लंडने फायनलमध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला होता. बेन स्टोक्सने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्याला मोईन अलीनेही चांगली साथ दिली होती.