मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या अंतिम सामन्याची वेळ जशीजशी जवळ येत आहे तसं सर्वांची धाकधूक वाढत आहे. क्रिकेटप्रेमींचा उत्साह तर शिगेला पोहोचला आहे. 2 जून रोजी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी निघणार आहे. त्याआधी टीम इंडियाची जर्सी लाँच करण्यात आली आहे. या जर्सीचं वैशिष्ट्यं म्हणजे या जर्सीसोबत 90 च्या दशकातील आठवणी जोडल्या गेल्या आहेत. टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू रविंद्र जडेजानं जर्सीचा फोटो शेअर केला आहे.
साउथेम्पटन इथे टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड 18 ते 22 जून दरम्यान WTC 2021चा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना ड्युक बॉलने खेळला जाईल. अंतिम सामना पाहण्यासाठी नागरिक उपस्थित असणार आहेत. या सामन्याची तिकीटं 2 लाख रुपयांना देखील विकली गेली आहेत. इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. 90च्या दशकातील आठवणी थ्रोबॅक असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
या जर्सीवर पुढच्या बाजूला इंडिया मोठ्या अक्षरात निळ्या रंगात लिहिलेलं आहे. दुसऱ्य़ा बाजूला BCCIचा लोगो आहे. WTC फायनल्स एका बाजूला लिहिलेलं आहे. या जर्सीवर कोणत्याही इतर कंपन्यांचे किंवा स्पॉन्सर्सची नावं नाही आहेत. आतापर्यंत दोन ICC टेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. जर का आताचा सामना टीम इंडिया जिंकली तर विराट कोहलीच्या नेतृत्वात हा पहिला ICC WTC पहिली ट्रॉफी टीम इंडियाकडे येईल. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.