मला कोणाचं करियर संपवायचं नाही; कोणाला उद्देशून म्हणाला साहा?

वृद्धिमान साहाने अलीकडेच एका पत्रकारावर मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता.

Updated: Feb 22, 2022, 11:06 AM IST
मला कोणाचं करियर संपवायचं नाही; कोणाला उद्देशून म्हणाला साहा? title=

मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहाने एकामागून एक खुलासे करून खळबळ उडवून दिली आहे. वृद्धिमान साहाने अलीकडेच एका पत्रकारावर मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता. दरम्यान या पत्रकाराचं नाव सांगणार नसल्याचं वृद्धीमान साहा याने सांगितलं आहे. 

श्रीलंकेविरोधात टीम जाहीर झाली असून त्यामध्ये वृद्धीमान साहाचा समावेश करण्यात आलेला नाही. यानंतर एका पत्रकाराने साहाला इंटरव्ह्यूसाठी मेसेज केला होता. मात्र साहाकडून उत्तर न मिळाल्याने धमकीच्या स्वरूपात त्याचा कधीच इंटरव्ह्यू घेणार नसल्याचं म्हटलं. 

या पत्रकारासोबत झालेलं व्हट्सएपचं संभाषण त्याने ट्विटवर शेअर केलं. यावेळी अनेक माजी खेळाडूंचं त्याला समर्थन मिळालं. बीसीसीआय देखील याबाबत चौकशी करणार आहे. मात्र साहा त्या पत्रकाराचं नाव सांगण्यास तयार नाहीये.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत साहा म्हणाला, "अजून बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्याच्याशी संवाद साधला नाही. जर त्यांनी मला त्या पत्रकाराचं नाव सांगण्यास सांगितलं तर मी सांगेन की, कोणाचंही करियर संपवण्याचा माझा हेतू नाही. म्हणूनच मी ट्विटमध्येही त्याचं नाव घेतलेलं नाही." 

साहा पुढे म्हणाला की, "सगळ्यांना फक्त समजलं पाहिजे की, मीडियामध्ये असं कोणी काम करतंय, आणि हाच माझा उद्देश होता. तसंच भविष्यात कोणत्या खेळाडूंना अशा गोष्टीला सामोरं जावं लागू नये ही माझी इच्छा आहे."

बीसीसीआय अॅक्शनमोडमध्ये

वृद्धिमान साहाच्या आरोपांनंतर आता बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. बीसीसीआयने याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. साहा बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू आहे, अशा परिस्थितीत बोर्ड आपल्या खेळाडूंना एकटे सोडू शकत नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. साहाने केलेल्या आरोपांची चौकशी बोर्ड चौकशी करणार आहे. याआधी कोणत्या क्रिकेटपटूला अशा धमक्यांचा सामना करावा लागला आहे का, याचाही बोर्ड शोध घेणार आहे. मात्र, त्याआधी बीसीसीआयने साहाला त्या व्यक्तीचं नाव बोर्ड अधिकाऱ्यांकडे उघड करण्यास सांगितलं आहे.