ऑस्ट्रेलिया : सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचचं ऑस्ट्रेलिया ओपन खेळण्याचं स्वप्न अपुरं राहण्याची शक्यता आहे. कारण जोकोविचचा ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. यामुळे नोवाकला बरेच तास मेलबर्न एअरपोर्टवर थांबवण्यात आलं होतं.
जोकोविच मेलबर्नमध्ये पोहोचल्यानंतर अधिकार्यांना आढळून आलं की, नोवाकने लस न घेतलेल्या विसासाठी विनंती केली नव्हती. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, जोकोविच प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे आवश्यक कागदपत्र सादर न केल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे.
यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, "नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. नियम आणि कायदे प्रत्येकासाठी आहेत. या नियमांच्या वर कोणी नाही. कोविड-19 मुळे जगातील सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या ऑस्ट्रेलियासाठी आमची सीमा धोरणं महत्त्वाची आहेत. त्यामुळे आम्ही सतर्क आहोत."
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्यासाठी नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियात दाखल झाला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्यासाठी त्याला लस न घेण्याबाबत सूट देण्यात आली होती. या गोष्टीचा ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड विरोध झाला होता.
मुख्य म्हणजे जोकोविचने आता पर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा एकंही डोस घेतलेला नाही. काही वैद्यकीय कारणांमुळे त्याने लस घेतली नसल्याचं सांगितलं होतं.
विशेष म्हणजे नोवाक जोकोविचने त्याच्या लसीच्या स्थितीबद्दल माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता जोकोविच कायदेशीररित्या अपील करू शकतो किंवा पुन्हा विसासाठी अर्ज करू शकतो.