India Will Become World No. 1 ODI Team: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना आज मोहालीच्या मैदानामध्ये खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फिरकीपटू आर. अश्वीन आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना संघात संधी देण्यात आली असून भारताने या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास भारत आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट संघांच्या यादीत पहिल्या स्थानी झेप घेईल.
सध्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 14 सप्टेंबर रोजी पहिल्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालेल्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या वाईट कामगिरीमुळे 4 दिवसांमध्येच पुन्हा पहिला क्रमांक 18 सप्टेंबर रोजी मिळाला. मात्र आता 22 सप्टेंबर म्हणजे पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर 4 दिवसांमध्येच पाकिस्तानची पुन्हा गच्छंती होईल अशी शक्यता आहे.
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर फेरीमध्ये भारताला बांगलादेशने 15 सप्टेंबर रोजी पराभूत केलं. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने 2-3 ने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने 17 तारखेला झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने पाकिस्तानने पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 122 धावांनी जिंकला. याचा फटका ऑस्ट्रेलियाला आयसीसी क्रमवारीमध्ये बसला आणि त्यांनी पहिलं स्थान गमावलं. ते 113 अंकांसहीत थेट तिसऱ्या क्रमाकांवर घसरले.
भारताबद्दल सांगायचे झाल्यास भारताचा संघ सुपर फोरच्या फेरीत बांगलादेशकडून पराभूत झाला. मात्र अंतिम सामन्यात रविवारी श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत केल्याने भारत 115 अंकांसहीत दुसऱ्या स्थानी पोहोचला. खरं तर भारत आणि पाकिस्तानचे गुण समान आहेत मात्र दोन्ही देशांमधील अंकांमध्ये फक्त काही पूर्णांकांचा फरक आहे. भारताचा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला नसता तर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर भारत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला असता.
आता भारताला ही चूक सुधारण्याची संधी मोहालीच्या मैदानात आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला तर भारत पहिल्या स्थानावर पोहचेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही सामने जिंकले तर जागतिक स्तरावरील पहिल्या क्रमांकाचा संघ म्हणून भारत वर्डकप स्पर्धेमध्ये प्रवेश करेल.
मोहालीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचे अन्य 2 सामन्यांपैकी एक सामना 24 सप्टेंबर रोजी रविवारी इंदूरमध्ये होणार आहे. तर 27 सप्टेंबर रोजी मालिकेतील शेवटचा सामना राजकोटमध्ये होणार आहे. शेवटच्या सामन्यात भारताचे सर्व आघाडीचे खेळाडू खेळणार आहेत.