Virat Kohli Mumbai Airport Video Goes Viral : रविवारी वर्ल्ड कप 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये भारताने नेदरलॅण्डला पराभूत केलं. या सामन्यामध्ये विराट कोहलीने उत्तम अर्धशतक झळकावलं आणि एक विकेटही घेतली. बंगळुरुमध्ये झालेल्या या सामन्याला विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होती. सामना संपल्यानंतर विराट कोहली कुटुंबासोबत मुंबईत परतला. मात्र मुंबई विमानतळावर विराट फोटोसाठी गर्दी करणाऱ्यांवर संतापला.
विराट कोहली नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यानंतर अनुष्का आणि मुलगी वामिकाबरोबर मुंबईला परत आला. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सेमीफायलनचा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर 15 तारखेला होणार आहे. याच सामन्यासाठी विराट संघाबरोबर न येता पत्नी आणि मुलीबरोबर बंगळुरुवरुन मुंबईत दाखल झाला. विराट मुंबई विमानतळावरुन बाहेर पडून त्याच्या कारकडे जात असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये विराट बाहेर पडत असताना फोटोग्राफर्स आणि चाहत्यांनी त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. विराटने विमानतळाच्या गेटपासून कारपर्यंत फोटो काढू दिले. मात्र कारजवळ त्याने चाहत्यांना फोटो देण्यास नकार दिला.
कारमध्ये वामिका असल्याने विराटने कारजवळ फोटो देणार नाही असं स्पष्ट केलं. विराट थोड्या चिडलेल्या स्वरामध्येच फोटोसाठी हट्ट करणाऱ्यांना, "इथेच काढा (फोटो) गाडीजवळ नाही. ती सकाळी सकाळी उठून आलीय, प्लीज सजून घ्या," असं विराट म्हणाला. त्यानंतरही फोटोसाठी हुज्जत आणि प्रयत्न सुरु असल्याचं पाहून विराटने, "अरे बेटी को घर लेके जाना है," असं पापाराझींना आणि चाहत्यांना सांगितलं.
"Beti ko ghr leke jana hai"
Virat requested the media not to click because Vamika is with him#viratkohli #anushkasharma pic.twitter.com/DqmtyBbJ1t— (@wrogn_edits) November 13, 2023
श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्या दमदार शतकांच्या जोरावर भारताने नेदरलॅण्डला 160 धावांनी पराभूत करुन साखळी फेरीतील 9 वा सामनाही जिंकला. श्रेयस अय्यरच्या 128 नाबाद आणि के. एल. राहुलच्या 102 धावांमुळे भारताला 50 ओव्हरमध्ये 410 वर 4 बाद इतकी मजल मारता आली. भारताने या सामन्यात 9 गोलंदाजांचा वापर केला. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माचाही समावेश होता. या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेत नेदलॅण्डला 250 वर बाद करण्यास खारीचा वाटा उचलला.
पहिल्या सेमीफायलनमधून जिंकणारा संघ आणि 16 तारखेला कोलकात्यामधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामधून जिंकणारा संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळणार आहे. भारताने 2011 ला शेवटचा वर्ल्ड कप जिंकला होता. तर 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. हा दुष्काळ संपवण्याचा भारतीय संघाचा मानस आहे.