Zero ची Hattrick करणारा सूर्यकुमार ODI World Up खेळणार? रोहित स्पष्टपणे म्हणाला, 'त्याने...'

World Cup 2023 Rohit Sharma On Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव सातत्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारचं एकदिवसीय क्रिकेट संघात स्थान मिळणार की नाही याबद्दल उलट सुटल चर्चा सुरु आहेत. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 11, 2023, 01:25 PM IST
Zero ची Hattrick करणारा सूर्यकुमार ODI World Up खेळणार? रोहित स्पष्टपणे म्हणाला, 'त्याने...' title=
सूर्यकुमारला संधी देण्यासंदर्भात विचारण्यात आलेला प्रश्न

World Cup 2023 Rohit Sharma On Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट संघामधून खेळणारा सूर्यकुमार यादव हा आयसीसीच्या टी-20 रॅकिंगच्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये सूर्यकुमारने त्याचा या फॉरमॅटमध्ये दबदबा का आहे याची झलक दाखवली. मात्र सूर्यकुमारसंदर्भात सध्या एकच चर्चा सुरु आहे. ती म्हणजे हा स्फोटक फलंदाज एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये असेल की नाही? टी-20 मधील स्फोटक फलंदाजी करणाऱ्याला सूर्यकुमारची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी फारच वाईट आहे. मात्र त्याला एकदिवसीय क्रिकेट संघात स्थान देण्यासंदर्भात संघाचा कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाचं विधान केलं आहे. यावरुन सूर्यकुमार एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक खेळणार की नाही हे स्पष्ट झालं आहे.

रोहित काय म्हणाला सूर्यकुमारबद्दल?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवची पाठराखण केली आहे. टी-20 मध्ये सध्या आघाडीचा खेळाडू असलेला सूर्यकुमार हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर खेळतो हे सुद्धा चाहत्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे. "तो सध्या फार मेहनत घेत आहे. तो अशा अनेक लोकांशी सध्या चर्चा करत आहे जे फार एकदिवसीय क्रिकेट खेळले आहेत. या चर्चेमधून एकदिवसीय क्रिकेट खेळताना कोणत्या प्रकारची भूमिका आणि मानसिकतेची गरज असते हे जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे," असं रोहितने म्हटलं आहे.

10 सामन्यांमध्ये एकही मोठी खेळी नाही

सूर्यकुमार यादव हा टी-20 मध्ये एकहाती सामना फिरवण्याची ताकद असलेला खेळाडू आहे. मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला फारस यश आलेलं नाही. एकदिवसीय क्रिकेटमधील मागील 10 सामन्यांमध्ये एकही मोठी खेळी सूर्यकुमारला करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियावरुद्ध घरगुती मैदानांवर झालेल्या मालिकेमध्ये सलग 3 सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. 

त्याला संधी देणं गरजेचं कारण...

"त्याच्यासारख्या खेळाडूला अतिरिक्त सामन्यांमध्ये संधी देणं गरजेचं आहे कारण त्याला लय गवसणे आणि आत्मविश्वास वाटणे संघाच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं. ज्या पद्धतीने त्याने यंदाच्या आयपीएलला सुरुवात केली ती पाहा. पहिल्या 4-5 सामन्यांमध्ये त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. मात्र नंतर त्याने काय केलं पाहा," असं रोहितने सूर्यकुमारची पाठराखण करताना म्हटलं आहे. सूर्यकुमार हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच मुंबईचा संघ आयपीएलमध्ये खेळत असल्याने रोहितने सूर्यकुमारचा खेळ जवळून पाहिला आहे.