'एक विकेट, एक प्लेट बिर्याणी' फॉर्म्युल्यामुळे भारताला गवसला शमी नावाचा हिरा; भन्नाट प्रवास वाचाच

Mohammed Shami Ek Wicket Ek Plate Biryani Formula: एका छोट्याश्या गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपर्यंत मजल मारणाऱ्या मोहम्मद शमीने मागील 3 सामन्यामध्ये तब्बल 14 विकेट्स घेत भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं असून तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 3, 2023, 02:41 PM IST
'एक विकेट, एक प्लेट बिर्याणी' फॉर्म्युल्यामुळे भारताला गवसला शमी नावाचा हिरा; भन्नाट प्रवास वाचाच title=
शमीन 3 सामन्यांमध्ये घेतल्या 14 विकेट्स

Mohammed Shami Ek Wicket Ek Plate Biryani Formula: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा जहीर खानचा विक्रम श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोडीत काढला आहे. शमीने श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या 33 व्या सामन्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पाहुण्यांचा अर्धा संघ 18 धावांवर तंबूत धाडला. केवळ 3 सामन्यांमध्ये शामीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 5 आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्यानंतर श्रीलंकेविरुद्धही 5 विकेट्स घेत विक्रम रचला. मात्र आज शमीला प्रसिद्धी मिळत असली तरी एकेकाळी केवळ बिर्याणीसाठी तो विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध होता हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. शमीला पहिल्यांदा क्लब क्रिकेटमध्ये संधी देणाऱ्या त्याच्या मार्गदर्शकानेच हा किस्सा सांगितला आहे.

शमीचे क्रिकेटमधील सुरुवातीचे दिवस अन् तो मार्गदर्शक

क्रिकेटच्या वेडापायी शमी वयाच्या 15 व्या वर्षापासूनच मुरादाबादमधील आपल्या मूळ गावापासून आणि पालकांपासून दूर राहू लागला. त्याला पहिल्यांदा मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी पश्चिम बंगालमध्ये मिळाली. शमीला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील करिअरच्या सुरुवातीला छोट्या क्लबकडून खेळावलं लागलं. कोलकात्यामध्ये तोपर्यंत ओळख असेपर्यंत मोहन बागान किंवा कालीघाटसारख्या मोठ्या क्लबकडून खेळता येत नसे. म्हणून शमी डलहौसी अॅथलेटीक क्लबकडून खेळायचा. याचवेळेस त्याच्या गोलंदाजीने टाऊन क्लबचे सचिव आणि क्रिकेट असोसिएशनच ऑफ बंगालचे सहाय्यक सचिव देबब्रता दास यांचं लक्ष वेधलं. 'क्रिकेट कंट्री'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दास यांनी, "मी त्याला पहिल्यांदा राजस्थान मैदानावर पाहिलं. त्याचं कौशल्य पाहून मी थक्क झालो. तो मध्यम उंचीचा गोलंदाज फार उत्तम गोलंदाजी करत होता. त्याचं रनअप, शैली आणि वेग उत्तम होता. ती या पर्वामधील डलहौसीची शेवटची मॅच होती. त्यावेळेस मी त्याला 75 हजार रुपये प्रत्येक सिझनसाठीच्या बोलीवर माझ्या क्लबसाठी खेळायला सांगितलं. रोजचे जेवणाचे 100 रुपये देण्याचंही आमचं ठरलं," असं सांगितलं.

मैदानाबाहेरून बिर्याणीची ती आरोळी यायची अन्...

मात्र त्यावेळी शमीकडे कोलकात्यामध्ये राहण्यासाठी जागा नव्हती. "त्याने मला मी कुठं राहणार असं विचारलं. मी माझ्या क्रिकेटपटूंना मुलांप्रमाणे मानतो. म्हणून त्याला मी घरी घेऊन गेलो आणि त्याला म्हणालो तू इथे राहा," असं शमीला सांगितल्याचं दास म्हणाले. शमीने टाऊन क्लबकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याच्या खेळाने सारेच प्रभावित झाले. "त्या पर्वात टाऊन क्लबने उत्तम कामगिरी केली. शमी फारच प्रभावी ठरला. त्याला बिर्याणी फार आवडायची. त्यामुळे जेव्हा विकेटची गरज असायची तेव्हा मी मैदानाबाहेरुन ओरडायचो, 'एक विकेट, एक बिर्याणी!' त्यानंतर तो नेहमीच विकेट घ्ययाचा," अशी आठवण दास यांनी सांगितली.

नक्की पाहा >> 15 कोटींच्या फार्म हाऊसमधील शामीचा गावरान थाट पाहिला का?

तुम्ही केवळ एकदा त्याला बॉलिंग करताना बघा

"त्याला बंगलाच्या निवडकर्त्यांनी 22 वर्षांखालील संघात घ्यावं अशी मी गळ घातली. मात्र तो कोणत्याही मोठ्या क्लबकडून खेळत नव्हता म्हणून त्याला संघात संधी मिळाली नाही. त्यानंतर मी त्यावेळी निवडकर्ते असलेल्या संब्रन बॅनर्जी यांच्याकडे गेलो आणि तुम्ही केवळ एकदा शमीला गोलंदाजी करताना पाहा, असं म्हटलं," अशी माहिती दिली. सौरव गांगुलीला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिली संधी देणारे निवडकर्ते अशी ओळख असलेल्या बॅनर्जी यांनी शमीमधील कौशल्य हेरलं आणि त्याला बंगालच्या विजय हजारे चषकाच्या संघात स्थान दिलं. त्यानंतर त्याने मोहन बागानकडून खेळण्यास सुरुवात केली.

गांगुलीला गोलंदाजी केली अन्...

एकदा शमीने सौरव गांगुलीला गोलंदाजी केली होती. गांगुलीही त्याच्या गोलंदाजीने प्रभावित झाला. गांगुलीने शमीची विशेष काळजी घ्यावी आणि त्याला संधी द्यावी असं निवडकर्त्यांना सांगितलं आणि त्यानंतर शमीने मागे वळून पाहिलं नाही. त्याला बंगालच्या रणजी संघात स्थान मिळू लागलं. मग तो भारताकडून एकदिवसीय क्रिकेट खेळू लागला. त्याने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ईडन गार्डन्सवरील वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केलं.