पाकिस्तान जिंकणार 2023 चा वर्ल्ड कप? 1992 च्या वर्ल्ड कपसारखा विचित्र योग जुळून आला

Can Pakistan Qualify For Semi Final: पाकिस्तानच्या संघाने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये नुकताच अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पराभूत झाला आहे. मात्र या माध्यमातून आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 25, 2023, 08:57 AM IST
पाकिस्तान जिंकणार 2023 चा वर्ल्ड कप? 1992 च्या वर्ल्ड कपसारखा विचित्र योग जुळून आला title=
1992 साली पाकिस्तानने जिंकलेला वर्ल्ड कप

Can Pakistan Qualify For Semi Final: पाकिस्तानला अफगाणिस्तानने पराभूत केल्याने त्यांची वर्ल्ड कप 2023 च्या उपांत्यफेरीत पोहचण्याची उरली सुरलेली आशाही संपुष्टात आली आहे का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. मात्र पाकिस्तान अजूनही उपांत्यफेरीच्या स्पर्धेत कायम आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून यासंदर्भात सर्वाधिक सर्च केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानचा पॅटर्न बिनभरोश्याचा

खरं तर पाकिस्तान उपांत्यफेरीसाठी पात्र होणार की नाही याची आकडेमोड आणि सविस्तर उत्तर फारच गुंतागुंतीचं आहे. सध्याच्या स्पर्धेतील पॉइण्ट्स टेबल आणि आतापर्यंतची बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी पाहिली तर पाकिस्तानचा संघ अंतिम 4 संघांमध्ये नसेल अशीच जास्त शक्यता आहे. मात्र पाकिस्तानमधील क्रिकेटचा पॅटर्न हा फारच बिनभरोश्याचा आहे. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली जो 1992 चा वर्ल्ड कप पाकिस्तानने जिंकला होता, त्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानची परिस्थिती आजच्यापेक्षाही वाईट होती. त्यावेळीही पाकिस्तान उपांत्यफेरीपर्यंतही जाणार नाही असं सांगितलं जात होता. मात्र पाकिस्तानने केवल उपांत्यफेरी गाठली असं नाही तर थेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

झिरोचे हिरो

अर्थात हा इतिहास झाला. तसेच त्यावेळी इम्रान खान यांच्यासारखा प्रभावी कर्णधार पाकिस्तानकडे होता. तसेच वसीम अक्रम, वकार यूनुस सारखे गोलंदाज पाकिस्तानी संघात होते. आजच्या पाकिस्तानी संघाची गोलंदाजी ही खिल्ली उडवण्याइतकी वाईट झाली आहे. पाकिस्तानी गोलंदाजांना लय गवसत नसल्याचं दिसत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी, "क्रिकेट असा खेळ आहे जिथे आजचे हिरो उद्याचे झिरो ठरतात," असं म्हटलं आहे. हेच तर्क लावल्यास आजचे झीरो उद्या हिरो होऊ शकतात. पाकिस्तानी संघाला उपांत्यफेरी गाठण्यासाठी असेच काहीतरी करावे लागेल. याशिवाय इतर कोणताही मार्ग पाकिस्तानकडे आता उपलब्ध नाही.

पाकिस्तानला काय करावं लागेल?

पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत 5 सामने खेळला आहे. त्यापैकी 3 सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतसारख्या मोठ्या संघांबरोबरच अफगाणिस्ताननेही पाकिस्तानला धूळ चारली आहे. अफगाणिस्तानच्या विजयानंतर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका होता आहे. पाकिस्तानकडे सध्या 4 पॉइण्ट्स आहेत. पाकिस्तानचा नेट रन रेट -0.400 इतका आहे. पॉइण्ट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचेही 4 पॉइण्ट्स आहेत. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानपेक्षा उत्तम यासाठी आहे कारण पाकिस्तान 3 वेळा पराभूत झाला आहे तर ऑस्ट्रेलिया केवळ 2 वेळा. ऑस्ट्रेलियाचे 6 सामने शिकल्लक आहेत. आज म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया नेदरलॅण्डविरुद्ध सामना खेळणार आहे. पाकिस्तानला उपांत्यफेरी गाठण्यासाठी केवळ जिंकून चालणार नाही तर त्यांना ऑस्ट्रेलियापेक्षा उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. सध्या भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका टॉप 4 पैकी पहिल्या 3 स्थानी आहे. 

1992 मध्ये आतापेक्षा वाईट स्थिती होती

पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन देणारी एकमेव गोष्ट म्हणजे इतिहासातील दाखले. पाकिस्तानच्या संघाने यापूर्वी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. 1992 साली पाकिस्तान पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी त्यांनी सुरुवातीचे 5 सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकला होता. म्हणजेच परिस्थिती आजपेक्षा अधिक वाईट होती. 2023 सारखाच 1992 मध्ये राउंड रॉबिन फॉरमॅटमध्येच वर्ल्ड कप खेळवण्यात आलेला. म्हणजे प्रत्येक संघ सहभागी असलेल्या संघाविरोधात एक मॅच खेळणार असं सामन्यांचं आयोजन केलेलं. पाकिस्तानने आपले शेवटचे 5 सामने जिंकत थेट जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे असा चमत्कार बाबरच्या संघाला जमतो का हे पाहणं रंजक ठरणार आहे.