राशीदला कोणी थांबवलं? भारताविरोधातील पराभवानंतर अफगाणिस्तान संघात खळबळ; कोच म्हणाले 'कर्णधाराला...'

भारताविरोधातील सामन्यात फिरकी गोलंदाज राशीद खानला उशिरा गोलंदाजी दिल्याने अफगाणिस्तान संघावर टीका होत आह. यादरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी यावर भाष्य करताना भूमिका मांडली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 12, 2023, 03:43 PM IST
राशीदला कोणी थांबवलं? भारताविरोधातील पराभवानंतर अफगाणिस्तान संघात खळबळ; कोच म्हणाले 'कर्णधाराला...' title=

एकदिवसीय वर्ल्डपमध्ये अफगाणिस्तान संघाची सुरुवात फार चांगली झालेली नाही. आपल्या पहिल्यात सामन्यात अफगाणिस्तानला बांगलादेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. बांगलादेशने 6 गडी राखून बांगलादेशचा पराभव केला. यानंतर बुधवारी 11 ऑक्टोबरला भारताविरोधात दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात त्यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताने 8 गडी राखत अफगाणिस्तानचा मोठा पराभव केला. 

भारताविरोधातील सामन्यात अफगाणिस्तान संघाची रणनीती सपशेल अपयशी ठरली. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, फिरकी गोलंदाज राशीद खानला फार उशिरा गोलंदाजी देण्यात आली. राशीद 15 व्या ओव्हरला गोलंदाजी करण्यासाठी आला होता. यामुळे अफगाणिस्तान संघावर मोठी टीका होत आहे. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी यामध्ये आपली काही भूमिका नसल्याचं म्हटलं आहे. 

सामन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना जोनाथन ट्रॉट यांनी सांगितलं की, "मी राशीदला थांबवलं नव्हतं. मला वाटतं अशा स्थितीत जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर त्याचा वापर करायला हवा होता. मला वाटतं हा कर्णधाराचा विशेषाधिकार आहे. कदाचित त्याने विचार केला असेल की, चेंडू अजून थोडा जुना झाल्यावर राशीदला फिरकी मिळेल. पण तुम्ही नक्कीच राशीदसारख्या गोलंदाजाचा लवकर वापर केला पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जिथे आम्ही लक्ष दिल पाहिजे". 

राशीदने घेतल्या दोन विकेट

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने 15 व्या ओव्हरला राशीदकडे चेंडू सोपवला तेव्हा भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. भारतीय संघाने एकही विकेट न गमावता 125 धावा करत सामन्यावर वर्चस्व मिळवलं होतं. राशीदने 19 व्या आणि आपल्या तिसऱ्या ओव्हरला ईशान किशनला बाद करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर त्याने 26 व्या ओव्हरला रोहितला बोल्ड केल. पण तोपर्यंत सामना अफगाणिस्तानच्या हातून निसटला होता. 

राशीदने 8 ओव्हरमध्ये 57 धावा देत विकेट घेणारा संघातील एकमेव गोलंदाज ठरला. अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने भारतासमोर 273 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने आक्रमकपणे फलंदाजी करत हे लक्ष्य गाठलं. कर्णधार रोहित शर्माने 84 चेंडूत 131 धावा केल्या. भारताने 35 व्या ओव्हरलाच सामना जिंकला. 

कोण आहे जोनाथन ट्रॉट?

जोनाथन ट्रॉटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इंग्लंडकडून 52 कसोटी, 68 एकदिवसीय आणि सात टी-20 सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या जोनाथन ट्रॉटने कसोटी सामन्यांमध्ये 44.08 च्या सरासरीने 3835 कसोटी धावा केल्या. 2009 च्या अॅशेस मालिकेतून त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. ट्रॉटच्या वनडेत 51.25च्या सरासरीने 2819 धावा आहेत. 

ट्रॉटने वनडेमध्ये 4 शतकं आणि 22 अर्धशतकं झळकावली आहेत. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचं झाले तर ट्रॉटने 23 च्या सरासरीने 138 धावा केल्या आहे. ट्रॉट यांची जुलै 2022 मध्ये अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.