World Cup: भारतीय क्रिकेट फॅन्स म्हणतात; 'वर्ल्ड कप पबजीचा नाही'

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Updated: May 22, 2019, 04:23 PM IST
World Cup: भारतीय क्रिकेट फॅन्स म्हणतात; 'वर्ल्ड कप पबजीचा नाही' title=

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. मंगळवारी रात्री भारतीय टीम मुंबई विमानतळावरून इंग्लंडला रवाना झाली. २५ तारखेला भारतीय टीम लंडनच्या ओव्हल मैदानात पहिला सराव सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. तर २८ मेरोजी भारताचा दुसरा सराव सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. ३० तारखेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार असली, तरी भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

इंग्लंडला रवाना होण्याआधी भारतीय टीमचे विमानतळावरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये भारताचे खेळाडू आपल्या मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबमध्ये गेम खेळताना दिसत आहेत. फॉर्मल कपडे घातलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये धोनी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल आपल्या गॅजेट्समध्ये डोकं घालून गेम खेळताना पाहायला मिळालं.

खेळाडूंना विमानतळावर गेम खेळताना पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी तर 'भारत क्रिकेटचा वर्ल्ड कप खेळायला चालला आहे, पबजीचा नाही, हे विसरू नका,' असे सल्लेही भारतीय क्रिकेटपटूंना दिले.

भारतीय टीम यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. यावेळची भारतीय टीम संतुलितही आहे. यावेळी भारतीय टीमची बॉलिंग सगळ्यात मजबूत आहे. याआधीच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम आपल्या बॅटिंगसाठी ओळखली जायची.