मुंबई : २०१९ सालच्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा सोमवारी करण्यात आली. युवा विकेट कीपर ऋषभ पंत याच्याऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली. पण भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी पंतची निवड न झाल्यामुळे आपण हैराण आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे. ऋषभ पंत हा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, तसंच पंत त्याच्या विकेट कीपिंगमध्येही सुधारणा करत आहे, असं गावसकर म्हणाले.
निवड झालेल्या भारतीय टीमबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, 'पंतचा फॉर्म बघता त्याची निवड न होणं हैराण करणारं आहे. पंत सध्या चांगली बॅटिंग करत आहे. त्याच्या विकेट कीपिंगमध्येही सुधारणा होत आहे. पंतची निवड झाली असती तर त्याने पहिल्या सहा क्रमांकामध्ये डावखुऱ्या बॅट्समनचा पर्याय दिला असता. प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलरला हे अडचणीचं झालं असतं, कारण डावखुऱ्या बॅट्समनना बॉलिंग करताना बॉलरना लाईन ऍण्ड लेन्थमध्ये बदल करावा लागतो. कर्णधारालाही वेगळी फिल्डिंग सेट करावी लागते.'
ऋषभ पंतची निवड झाली नसली तरी गावसकर यांनी कार्तिकची निवड योग्य ठरवली आहे. 'एखाद दिवशी चुकून धोनी आजारी पडला आणि तो खेळू शकला नाही, तर तुम्हाला चांगल्या विकेट कीपरची गरज पडेल. दिनेश कार्तिकला त्याच्या विकेट कीपिंगसाठीच टीममध्ये जागा मिळाली आहे,' असं गावसकर यांना वाटतं.
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही गावसकर यांच्यासारखच मत व्यक्त केलं आहे. 'टीम निवड करताना प्रत्येकाला खुश करणं अशक्य आहे. पण कार्तिकची निवड आश्चर्यकारक आहे. निवड समितीने सातत्य दाखवलं नाही. जानेवारी २०१९ मध्ये दिनेश कार्तिकला टीमबाहेर केलं, यानंतर आता त्याची वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड झाली,' असं मांजरेकर म्हणाले.
विजय शंकर याच्या भारतीय टीममधल्या निवडीचं गावसकर यांनी समर्थन केलं. बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग या त्रिआयामी विशेषतेमुळे विजय शंकरचा भारतीय टीमला फायदा होईल. मागच्या एका वर्षामध्ये विजय शंकरच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली आहे. त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे, असं विधान गावसकर यांनी केलं.