World Cup 2019 : शिखर धवनच्या दुखापतीवरुन गोंधळ सुरुच, बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

वर्ल्ड कपमध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली.

Updated: Jun 11, 2019, 09:28 PM IST
World Cup 2019 : शिखर धवनच्या दुखापतीवरुन गोंधळ सुरुच, बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया title=

लंडन : वर्ल्ड कपमध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर सोमवारी धवनच्या दुखापतीची कोणतीही चर्चा झाली नाही. मंगळवारी शिखर धवनला स्कॅनिंगला नेण्यात आलं, यानंतर त्याच्या दुखापतीची चर्चा दिवसभर सुरु होती.

शिखर धवनच्या दुखापतीमुळे कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याबाबतही तर्क लढवले जात होते. पण बीसीसीआयने याबाबत कोणतीच अधिकृत माहिती न दिल्यामुळे गोंधळ आणखी वाढत होता. अखेर रात्री ८ वाजता बीसीसीआयने शिखर धवनच्या दुखापतीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआयच्या अधिकृत वक्तव्यानुसार 'टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन हा इंग्लंडमध्येच राहणार आहे. बीसीसीआयची टीम शिखर धवनच्या रिकव्हरीवर नजर ठेवणार आहे. शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी बॅटिंग करताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.'

शिखर धवनची दुखापत किती गंभीर आहे? शिखर धवन मॅच खेळण्यासाठी कधी फिट होईल? याबाबत मात्र बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शिखर धवन दुखापतीमुळे एक आठवडा ते तीन आठवडे बाहेर राहू शकतो, असं सांगण्यात आलं. यानंतर शिखर धवनऐवजी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाईल, याची चर्चा सुरू झाली. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ३६ रननी विजय झाला. या मॅचमध्ये शिखर धवनने ११७ रनची शानदार खेळी केली. याच मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईलने टाकलेला बॉल शिखर धवनच्या अंगठ्याला लागला. तरीही धवनने बॅटिंग सुरुच ठेवली. बॅटिंगनंतर धवन फिल्डिंगला मात्र आला नाही. टीम इंडियाने ठेवलेल्या ३५२ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ५० ओव्हरमध्ये ३१६ रनवर ऑल आऊट झाला.

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पुढची मॅच १३ जूनरोजी न्यूझीलंडविरुद्ध आहे. या मॅचमध्ये शिखर धवन खेळला नाही, तर त्याच्याऐवजी रोहित शर्माबरोबर केएल राहुल ओपनिंगला येईल. याआधीच्या दोन मॅचमध्ये केएल राहुलने चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली होती. मग न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहलीकडे दिनेश कार्तिक आणि विजय शंकरचा पर्याय उपलब्ध आहे. किंवा विराट चौथ्या क्रमांकावर धोनीला खेळवून रवींद्र जडेजाचाही विचार करू शकतो. बॅटिंग आणि बॉलिंगसोबतच चपळ फिल्डिंग ही रवींद्र जडेजाची जमेची बाजू आहे.