मुंबई : ५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण अजूनही भारतीय टीममध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याबाबत संभ्रम कायम आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय टीमला सल्ला दिला आहे. वर्ल्ड कपमध्ये अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात यावी, असं संजय मांजरेकर म्हणाले आहेत. ३३ वर्षांच्या अंबाती रायुडूने ५५ वनडे मॅचमध्ये ४७.०५ च्या सरासरीने १,६९४ रन केले आहेत. तर २८ वर्षांच्या विजय शंकरने आठ वनडे आणि नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत.
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय टीम वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार संजय मांजरेकर म्हणाले, 'विजय शंकर एक-एक रन काढून समोरच्या बॅट्समनला स्ट्राईक देऊ शकतो. तसंच त्याच्याकडे सिक्स मारण्याचीही क्षमता आहे. यामुळे तो चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी योग्य आहे. पण विजय शंकरला फक्त बॅट्समन म्हणूनच टीममध्ये स्थान मिळालं पाहिजे. बॉलर म्हणून विजय शंकर फक्त ३ ओव्हरच टाकू शकतो. हे टीमसाठी बोनस असेल. शंकरकडून ६-७ किंवा १० ओव्हर पूर्ण टाकून घेऊ नये.'
'वेलिंग्टन वनडेमध्ये जेव्हा रायुडूने ९० रनची खेळी केली, तेव्हा वर्ल्ड कपमध्ये रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळेल, असा विश्वास मला होता. पण या सीरिजच्या तीन इनिंगमध्ये त्याने मोठा स्कोअर केला नाही. विजय शंकरने स्वत:ला सिद्ध करून रायुडूबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत', अशी प्रतिक्रिया संजय मांजरेकर याने दिली आहे.
भारताकडून ७४ वनडे आणि दोन वर्ल्ड कप खेळणाऱ्या संजय मांजरेकर यांना विराट कोहलीनं त्याच्या बॅटिंग क्रमात कोणताही बदल करू नये असं वाटतं. 'विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावरच बॅटिंग करावी. ज्या बॅट्समननी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करून वारंवार टीमला विजय मिळवून दिला आहे, त्या बॅट्समनच्या क्रमामध्ये बदल करण्याची काहीच गरज नाही', असं वक्तव्य मांजरेकर यांनी केले आहे.