World Cup 2019 : रोहित शर्माचा विश्वविक्रम! एकाच वर्ल्ड कपमध्ये पाचवं शतक

श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावून रोहित शर्माने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Updated: Jul 6, 2019, 09:36 PM IST
World Cup 2019 : रोहित शर्माचा विश्वविक्रम! एकाच वर्ल्ड कपमध्ये पाचवं शतक title=

लीड्स : श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावून रोहित शर्माने विक्रमाला गवसणी घातली आहे. एकाच वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं करणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने २०१५ वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं केली होती.

रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २७वं शतक आहे. ९२ बॉलमध्ये रोहित शर्माने त्याचं शतक पूर्ण केलं. ९४ बॉलमध्ये १०३ रन करून रोहित आऊट झाला. रोहितच्या खेळीमध्ये १४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. या शतकासोबतच रोहितने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये एकूण ६ शतकं आहेत. सचिनने ६ वर्ल्ड कपच्या ४४ इनिंगमध्ये ६ शतकं केली, तर रोहितने फक्त १६ इनिंगमध्येच ६ शतक पूर्ण केली आहेत. या यादीमध्ये रिकी पाँटिंगने ४२ इनिंगमध्ये, कुमार संगकाराने ३५ इनिंगमध्ये ५ शतकं केली होती.

२०१९ वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने ५ शतकं तर २०१५ वर्ल्ड कपमध्ये १ शतक केलं होतं. २०१५ वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये रोहितने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती. या वर्ल्ड कपमध्ये रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध शतक केलं आहे.