'वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताविरुद्धच्या ६ पराभवाचा बदला घेईल'

क्रिकेटच्या मैदानातलं भारत आणि पाकिस्तानमधलं द्वंद्व जगजाहीर आहे.

Updated: Feb 13, 2019, 05:36 PM IST
'वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताविरुद्धच्या ६ पराभवाचा बदला घेईल' title=

कराची : क्रिकेटच्या मैदानातलं भारत आणि पाकिस्तानमधलं द्वंद्व जगजाहीर आहे. पण दोन्ही देशातल्या खराब संबंधांमुळे या दोन्ही टीम आयसीसीच्या स्पर्धा वगळता एकमेकांविरुद्ध खेळत नाही. यावर्षी वर्ल्ड कपच्या निमित्तानं या दोन्ही टीम इंग्लंडमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड शानदार आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या सगळ्या ६ मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. पण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताच्या या सगळ्या ६ पराभवाचा बदला घेईल, असा विश्वास पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोईन खाननं व्यक्त केला आहे. वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होईल.

भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपची पहिली मॅच १९९२ साली झाली होती. तेव्हापासून झालेल्या ६ मॅचमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये १६ जूनला भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगेल.

मोईन खान पाकिस्तानमधल्या एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाला 'सध्याची पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पहिला विजय मिळवू शकते. ही टीम प्रभावशाली आहे. तसंच या टीममध्ये वेगळेपण असून कर्णधार सरफराज अहमदचा खेळाडूंशी चांगला ताळमेळ आहे. आमच्या टीमनं २ वर्ष आधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला पराभूत केलं होतं. इंग्लंडमधलं वातावरण आमच्यासाठी अनुकूल आहे, कारण आमच्याकडे चांगले बॉलर आहेत.'

मोईन खान हा वर्ल्ड कपच्या १९९२ आणि १९९९ सालच्या पाकिस्तान टीमचा सदस्य होता. भारत आणि इंग्लंड वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रबळ दावेदार आहेत, असंही मोईन खानला वाटतंय. 'पाकिस्तानची टीम दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिज खेळून वर्ल्ड कपला जाणार आहे. पाकिस्तानची टीम दिवस असला तर कोणत्याही टीमला हरवू शकते. पाकिस्तान यावेळी भारतालाही पराभूत करेल. पण भारत आणि इंग्लंडच्या टीमचं संतुलन चांगलं असल्यामुळे या दोन टीम वर्ल्ड कप जिंकू शकतात', असं वक्तव्य मोईन खाननं केलं.