लाहोर : वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पराभव झाल्यामुळे पाकिस्तानी टीम आणि त्यांचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर जोरदार टीका होत आहे. या सगळ्या वादानंतर प्रतिक्रिया दिलेल्या सरफराज अहमदला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने झापलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी सरफराज अहमदला फोन केला आणि आता उरलेल्या मॅचवर लक्ष द्या, असं सांगितलं. 'न्यूज डॉट कॉम डॉट पीके'ने ही बातमी दिली आहे.
'संपूर्ण देश हा पाकिस्तानी टीमसोबत आहे. बातम्या बघून लक्ष विचलित होऊन देऊ नका. पुढच्या मॅचमध्ये शांत राहून टीमचं नेतृत्व करा आणि कामगिरीमध्ये सुधारणा करा,' असं एहसान मणी सरफराजशी फोनवर बोलले.
भारताकडून ८९ रननी पराभव झाल्यानंतर भावूक झालेला सरफराज पाकिस्तानी टीमला म्हणाला, 'वर्ल्ड कपमधल्या बाकीच्या मॅचमध्ये कामगिरी सुधारली नाही तर आणखी टीकेला सामोरं जायला तयार राहा. मी घरी जाईन असं कोणाला वाटत असेल तर तो मूर्ख आहे. जर काही वेडंवाकडं झालं तर फक्त मीच घरी जाणार नाही.'
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने ५ पैकी फक्त १ मॅच जिंकली आहे, तर ३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आणि १ मॅच पावसामुळे रद्द झाली. पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान नवव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात ३ पॉईंट्स आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना २३ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेशाचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर पाकिस्तानला उरलेल्या चारही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. याचसोबत त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.