World Cup 2019: इंग्लंडच्या मैदानांमधील भारताचं रेकॉर्ड

इंग्लंडमध्ये ३० मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. 

Updated: May 14, 2019, 10:29 PM IST
World Cup 2019: इंग्लंडच्या मैदानांमधील भारताचं रेकॉर्ड title=

मुंबई : इंग्लंडमध्ये ३० मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या हा महाकुंभात भारताच्या ९ मॅच ६ मैदानांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एजबॅस्टनचाही समावेश आहे. एजबॅस्टनच्या मैदानातलं भारतीय टीमचं रेकॉर्ड शानदार राहिलं आहे. या मैदानात खेळवण्यात आलेल्या १० मॅचपैकी ७ मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर ३ मॅचमध्ये भारतीय टीमला पराभव पत्करावा लागला.

भारतीय टीमने एजबॅस्टनच्या मैदानात २०१३ नंतर लागोपाठ ५ मॅच जिंकल्या. यामध्ये पाकिस्तानविरुद्ध २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतला ८ विकेटने झालेला विजय आणि २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतला १२४ रननी झालेल्या विजयाचा समावेश आहे. पण या मैदानात भारताचा यंदाचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध ३० जूनला आणि बांगलादेशविरुद्ध २ जुलैला होईल. भारताने बांगलादेशला २०१७ साली या मैदानात ९ विकेटने पराभूत केलं होतं.

भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना १६ जूनला ओल्ड ट्रॅफर्ड, मॅन्चेस्टरमध्ये खेळवला जाईल. भारताने २००७ नंतर या मैदानात एकही मॅच खेळलेली नाही. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळलेल्या ८ मॅचपैकी भारताचा ३ मॅचमध्ये विजय आणि ५ मॅचमध्ये पराभव झाला आहे. १९९९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने याच मैदानात पाकिस्तानचा ४७ रननी पराभव केला होता.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

मॅन्चेस्टरमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २७ जूनला मॅच होईल. भारताने १९८३ वर्ल्ड कपच्या लीग स्पर्धेत वेस्ट इंडिजचा ३४ रननी पराभव केला होता. यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली होती. यानंतर या दोन्ही टीम पहिल्यांदाच या मैदानात खेळतील.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. रोज बाऊल साऊथम्पटनमध्ये हा सामना रंगेल. या मैदानात भारताने ३ पैकी १ मॅचमध्ये विजय आणि उरलेल्या २ मॅचमध्ये पराभव पत्करला. २००४ साली भारताने या मैदानात केनियाला हरवलं होतं. अफगाणिस्तानविरुद्धही भारत या मैदानात २२ जूनला मॅच खेळणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत आणि ऑस्ट्रेलियाची टक्कर ९ जूनला ओव्हलमध्ये होणार आहे. भारताने या मैदानात सर्वाधिक १५ वनडे खेळल्या आहेत. यातल्या फक्त ५ मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर ९ मॅचमध्ये भारताच्या पदरी निराशा पडली. एका मॅचचा निकाल लागला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये १९९९ वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा ७७ रननी विजय झाला होता.

भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली मॅच १३ जूनला खेळवली जाईल. ट्रेंटब्रिज, नॉटिंगहममध्ये हा सामना होईल. नॉटिंगहममध्ये भारताने खेळलेल्या ७ मॅचपैकी ३ मध्ये विजय आणि ३ मध्ये पराभव झाला. इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कपच्या तिन्ही मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ६ जुलैला हेडिंग्ली, लीड्सच्या मैदानात मॅच होणार आहे. आत्तापर्यंत या मैदानात खेळलेल्या भारताने ९ मॅच खेळल्या, यातल्या ३ मॅचमध्ये विजय झाला आहे. भारताने या मैदानात शेवटचा विजय २००७ साली मिळवला होता. भारत आणि श्रीलंका लीड्सच्या मैदानात पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.