मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम सेमी फायनलपर्यंत पोहोचेल, असं भाकीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू चामिंडा वासने व्यक्त केलं आहे. भारतीय टीम ही सध्या फॉर्ममध्ये आहे तसंच भारतीय टीमचं संतुलनही चांगलं आहे, असं मत वास याने व्यक्त केलं आहे.
'मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये भारतीय टीमने स्वत:चं वर्चस्व स्थापित केलं आहे. त्यांच्याकडे चांगले फास्ट बॉलरही आहेत,' असं वास म्हणाला. तसंच श्रीलंकेची टीमही या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करेल, असं वासला वाटतंय. 'मागच्या काही दिवसांमध्ये श्रीलंकेची कामगिरी चांगली झाली आहे. लसिथ मलिंगा हा श्रीलंकेचा एक्स फॅक्टर असेल,' असं वक्तव्य वासने केलं.
'श्रीलंकेच्या निवड समितीने योग्य टीम निवडली आहे. आता देशासाठी चांगलं खेळणं खेळाडूंवर अवलंबून आहे. मलिंगाच्या प्रदर्शन वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाचं ठरेल. आयपीएलमध्ये एक दिवस मुंबईकडून खेळताना आणि दुसऱ्या दिवशी श्रीलंकेत जाऊन खेळताना आपण मलिंगाला बघितलं आहे. यावरून त्याची खेळाप्रती असलेली बांधिलकी दिसते,' अशी प्रतिक्रिया चामिंडा वासने दिली.
श्रीलंकेच्या निवड समितीने दिमुथ करुणारत्नेची कर्णधार म्हणून निवड केली. करुणारत्नेने शेवटची वनडे २०१५ वर्ल्ड कपमध्ये खेळली होती. या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, पण वासने मात्र या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. 'मागच्या ६ महिन्यामध्ये श्रीलंकेने बरेच कर्णधार बदलले. पण या कर्णधारांनी टीमला काहीच दिलं नाही. श्रीलंकेकडे अनुभव आणि कामगिरीची कमी आहे', असं वास म्हणाला.
'दिमुथ करुणारत्नेवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेची टीम एकत्र होईल आणि वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करेल,' अशी अपेक्षा वासने व्यक्त केली.