वर्ल्ड कप फायनलच्या वादावर आयसीसीने मौन सोडलं

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या ऐतहिसिक फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाला.

Updated: Jul 16, 2019, 09:04 PM IST
वर्ल्ड कप फायनलच्या वादावर आयसीसीने मौन सोडलं title=

लंडन : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या ऐतहिसिक फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली ही मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. बाऊंड्रीच्या नियमावर इंग्लंडला विजेता घोषित करण्याच्या या नियमावर जगभरातून क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेटपटू टीका करत आहेत. तसंच आयसीसीकडे हा नियम बदलण्याची मागणीही करत आहेत.

एकीकडे या नियमावरून वाद सुरु असतानाच याच मॅचमध्ये अंपायरनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका न्यूझीलंडला बसला. शेवटच्या ओव्हरमध्ये ओव्हर थ्रोनंतर ५ रन देण्याऐवजी अंपायरनी ६ रन दिल्या. याचा परिणाम मॅचच्या निकालावर झाला. मॅचमध्ये अंपायरनी केलेली मोठी चूक माजी अंपायर सायमन टॉफेल यांनी लक्षात आणून दिली.

आयसीसीची प्रतिक्रिया

अंपायरनी केलेल्या या चुकीबद्दल आता आयसीसीने मौन सोडलं आहे. अंपायरनी मैदानामध्ये तो निर्णय घेतला. अंपायरनी मैदानात घेतलेल्या निर्णयावर आम्ही काहीही भाष्य करू शकत नाही, असं आयसीसीचे प्रवक्ते म्हणाले.

मैदानात नेमकं काय झालं?

इंग्लंडला शेवटच्या ३ बॉलमध्ये विजयासाठी ९ रनची गरज होती. यावेळी स्टोक्सने दोन रन घ्यायचा प्रयत्न केला. दुसरी रन काढताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने केलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागला आणि फोर गेली. यानंतर अंपायर कुमार धर्मसेना यांनी ६ रन दिल्या.

या परिस्थितीमध्ये अंपायरनी स्टोक्सची पहिली रन आणि ओव्हर थ्रोच्या ४ रन अशा एकूण ५ रन देणं आवश्यक होतं. तसंच दुसरी रन पूर्ण न झाल्यामुळे बेन स्टोक्स नॉन स्ट्रायकर एन्डला जाणं अपेक्षित होतं.

काय आहे आयसीसीचा नियम?

- आयसीसीच्या १९.८ नियमानुसार जर ओव्हर थ्रोमुळे बॉल बाऊंड्रीवर जात असेल तर त्यामध्ये बॅट्समनने पूर्ण केलेल्या रन जोडल्या जातात. 

- जर बॅट्समननी थ्रो करायच्या आधी एकमेकांना क्रॉस केलं तर ओव्हर थ्रोमध्ये त्या रनही जोडल्या जातील.

- जर फिल्डरने थ्रो फेकायच्या आधी बॅट्समननी एकमेकांना क्रॉस केलं नसेल, तर ती रन जोडली जाणार नाही.

मार्टिन गप्टीलने जेव्हा थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांनी दुसऱ्या रनसाठी एकमेकांना क्रॉस केलं नव्हतं. तरीही अंपायरनी इंग्लंडला २ रन आणि ओव्हर थ्रोच्या ४ रन अशा एकूण ६ रन दिल्या.

कुमार धर्मसेना आणि मरे एरॅसमस यांनी एमसीसीच्या या नियमाप्रमाणे निर्णय घेतला असता तर इंग्लंडला विजयासाठी २ बॉलमध्ये ४ रनची गरज असती, तसंच बेन स्टोक्स नॉन स्ट्रायकर एन्डला गेला असता. पण अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे स्टोक्स स्ट्राईकवर आला आणि इंग्लंडचं आव्हान २ बॉलमध्ये ३ रन एवढं झालं.