World Boxing Championship: मेरी कोमची सुवर्ण कामगिरी; सहाव्यांदा ठरली विश्वविजेती

अंतिम फेरीत मेरी चांगलीच आक्रमक पाहायला मिळाली.

Updated: Nov 24, 2018, 05:12 PM IST
World Boxing Championship: मेरी कोमची सुवर्ण कामगिरी; सहाव्यांदा ठरली विश्वविजेती title=

नवी दिल्ली: भारताच्या मेरी कोम हिने शनिवारी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नवा अध्याय रचला. युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत मेरी कोमने सहाव्यांदा जागतिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा पाच विश्व विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे.

अंतिम फेरीत मेरी चांगलीच आक्रमक पाहायला मिळाली. पहिल्या फेरीपासून तिने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या फेरीत तिने ओखोटाला हतबल करून सोडले होते. या पहिल्या फेरीनंतर मेरीचे मनोबल कमालीचे उंचावलेले दिसले आणि या गोष्टीचा फायदा तिला पुढील फेऱ्यांमध्ये झाला. दुसऱ्या फेरीत ओखोटोने मेरी कोमला चांगली झुंज दिली. यावेळी ओखोटोने मेरीला खालीही पाडले. तिसऱ्या सत्रातही ओखोटोने मेरीला चांगलंच जेरीस आणलं. मात्र, मेरी कोमने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामन्यावरून पकड निसटून दिली नाही. 

मेरी कोम १६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा विश्वविजेती ठरली होती. यानंतर तिने २००१, २००२, २००५, २००६, २००८, २०१० या वर्षांमध्ये जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.