'इंडिया दा मुंडा गोल्ड जीत्या ते...'; नीरज चोप्राने Gold जिंकताच नदीमच्या वडिलांची प्रतिक्रिया

Arshad Nadeem Father On Neeraj Chopra: जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदकावर नाव कोरलं तर पाकिस्तानच्या नदीमने रौप्यपदकावर नाव कोरलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 30, 2023, 11:43 AM IST
'इंडिया दा मुंडा गोल्ड जीत्या ते...'; नीरज चोप्राने Gold जिंकताच नदीमच्या वडिलांची प्रतिक्रिया title=
नदीमच्या वडिलांनी नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेबद्दल केलं भाष्य

Arshad Nadeem Father On Neeraj Chopra: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोणत्याही खेळात असला की दोन्ही देशातील चाहत्यांचं आपोआपच या सामन्याकडे लक्ष वेधलं जातं. मागील काही वर्षांमध्ये असाच काहीसा प्रकार भालफेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळत आहे. भारताचा गोल्डन बॉय असलेल्या नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम या दोघांमध्ये ही स्पर्धा पहायला मिळते. अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये सामान्यपणे असं फार क्वचित होतं की सुवर्णपदक भारतीयाने जिंकलं आणि रौप्यपदक पाकिस्तानी खेळाडूने पटकावलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 2021 साली सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या नीरजने नुकत्याच बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरत ऐतिहासिक कामगिरी केली. पाकिस्तानच्या नदीमने या स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावलं. 

अरशद पाहतो नीरजचे व्हिडीओ

सामन्यादरम्यान नीरज आणि नदीम दोघेही एकमेकांना खुन्नस देत आणि खेळ भावानेनं एकमेकांविरोधात उभे राहतात. मात्र हा संघर्ष केवळ मैदानापुरताच मर्यादीत असतो. सामना संपल्यानंतर दोघांमधील मैत्री अधोरेखित करणारे अनेक क्षण कॅमेरात कैद होतात. अरशद फावल्या वेळात नीरजचे व्हिडीओ युट्यूबवर पाहत असतो. अरशदचे वडील मोहम्मद अशरफ यांनीच यासंदर्भातील खुलासा केला होता. अरशदच्या वडिलांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरशद नेहमी नीरजबद्दल माझ्याशी गप्पा मारतो, असं सांगितलं. जायबंदी झाल्याने अरशद आरामासाठी घरी होता तेव्हा तो नीरजचेच व्हिडीओ पाहायचा असं अशरफ म्हणाले.

मला तो क्षण गमवायचा नव्हता

अशरफ यांनी फोनवरुन दिलेल्या मुलाखतीमध्ये जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमधील मुलाच्या कामगिरीवर भाष्य केलं. "काल रात्री झालेला अरशदचा सामना आम्ही सर्वांनी एकत्र पाहिला. मी वगळता सर्वांनाच मला सकाळी लवकर कामावर जायचं आहे हे ठाऊक होतं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मुलाला पदक जिंकताना पाहण्याचा क्षण मला गमवायचं नव्हता. फार नशिबाने हे असे क्षण वाटल्याला येतात," असं अशरफ म्हणाले.

नक्की वाचा >> नीरज चोप्रा मराठा? पानिपतच्या युद्धाशी खास कनेक्शन? पण यात तथ्य किती?

चौकात टीव्ही लावून 500 जणांनी पाहिला सामना

अरशद यांनी एक दिवसआधीच शेजाऱ्यांकडून एलसीडी भाड्याने घेतला होता. हा टीव्ही त्यांनी चौकामध्ये लावला होता. या ठिकाणी 500 हून अधिक लोकांनी जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेची अंतिम फेरी पाहिली. "मला भालाफेक खेळातील फारसं काही कळत नाही. मात्र जेव्हा माझ्या मुलाने जेव्हा पदक जिंकलं तेव्हा समजलं की त्याने काहीतरी मोठी कामगिरी केली आहे. त्याने गावाबरोबरच पाकिस्तानचा झेंडाही आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवला," असं अरशद म्हणाले.

नक्की वाचा >> तिथं नाही Autograph देऊ शकत! नीरज चोप्राचा 'हा' किस्सा वाचून वाटेल अभिमान

नीरजबद्दल काय म्हणाले?

नीरजबद्दल बोलताना अशरफ यांनी, "इंडिया दा मुंडा गोल्ड जीत्या ते अरशद हमेशा ओहरे गल करदा है," असं म्हटलं. म्हणजेच भारतीय तरुण सुवर्णपदक जिंकला त्याच्याबद्दल अरशद अनेकदा माझ्याशी गप्पा मारतो, असा अशरफ यांच्या प्रतिक्रियेचा अर्थ होता. यावरुन अरशद हा नीरजपासून अनेकदा प्रेरणा घेतो हे त्याच्या वडिलांना सांगायचं होतं. नीरज कशापद्धतीने आपल्यापेक्षा सरस ठरतो, त्याच्या शैलीत असा काय वेगळेपणा आहे हे समजून घेण्यासाठीही अरशद हे व्हिडीओ पाहतो.