इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिला क्रिकेटरने प्रशिक्षकावर विनयभंगाचा आरोप केला आहे. महिलेने एक व्हिडिओ संदेशात हे आरोप केले आहेत. या घटनेनंतर त्या प्रशिक्षकाला निलंबित करण्यात आले. याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
महिलेचा आरोप काय?
पीसीबीच्या एका महिला खेळाडूने मुलतान विभागाचे प्रशिक्षक नदीम इक्बाल यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. महिला खेळाडूने आरोपांचा एक व्हिडिओच जारी केला आहे. या व्हिडिओत ती म्हणतेय, "मला महिला संघात घेण्याचे आणि बोर्डात नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवून तो माझ्या जवळ आला.माझे लैंगिक शोषण करत राहिला आणि त्याचे काही मित्रही यात सामील होते. लैंगिक शोषणाचा व्हिडिओही बनवला आणि नंतर मला ब्लॅकमेल करत राहिला, असा गंभीर आरोप या महिला खेळाडूने केला आहे. पीडित महिला क्रिकेटपटूने पोलिस ठाण्यात तक्रारही केली आहे.
दरम्यान विनयभंग केल्याप्रकरणी माजी खेळाडू आणि सध्याच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तसेच नदीमने बोर्डातील नोकरीच्या अटींचे उल्लंघन केले आहे की नाही हे शोधण्यासाठी त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. "साहजिकच आम्ही पोलिसांकडून कोणताही गुन्हेगारी तपास करू शकत नाही, परंतु आमच्या तपासात त्याने आमच्या कराराच्या अटींचे उल्लंघन केले आहे की नाही हे उघड होईल," असे एका पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
नदीम हा त्याच्या काळातील प्रसिद्ध वेगवान गोलंदाज होता. महान वेगवान गोलंदाज वकार युनूस खेळला होता. 50 वर्षीय नदीमने 80 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि एकेकाळी तो वकारपेक्षा चांगला गोलंदाज मानला जात होता.
याआधीही लागले होते लैंगिक छळाचे आरोप
2014 मध्ये पाच तरुण महिला क्रिकेटपटूंनी मुलतानमधील एका खासगी क्रिकेट क्लबच्या अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. गेल्या वर्षी, पाकिस्तानचा कसोटी लेग-स्पिनर यासिर शाहवरही त्याच्या मित्राला एका तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात मदत केल्याचा आणि नंतर तिला धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारदाराने नंतर यासिरवरील आरोप मागे घेतले असले तरी त्याच्या मित्राविरुद्धचा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.