ICC T20 World Cup: कधी होणार पुढचा वर्ल्डकप? 'या' संघांनी अगोदरचं केलं क्वालिफाय!

ICC T20 World Cup: ICC दरवर्षी किमान एक ICC स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करते. शिवाय त्याचं वेळापत्रकही अशाच पद्धतीने बनवण्यात येतं. T20 विश्वचषक दर दोन वर्षांनी होतो. म्हणजेच पुढचा T20 विश्वचषक 2026 मध्ये असणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jul 3, 2024, 10:27 AM IST
ICC T20 World Cup: कधी होणार पुढचा वर्ल्डकप? 'या' संघांनी अगोदरचं केलं क्वालिफाय! title=

ICC T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे. टीम इंडिया वर्ल्डकपसह गुरुवारी सकाळी भारतात येणार आहे. भारताने पहिल्यांदा 2007 मध्ये हे विजेतेपद पटकावले होतं. त्यानंतर तब्बल 17 वर्षानंतर 2024 मध्येही टीम इंडिया चॅम्पियन बनली आहे. भारताशिवाय केवळ वेस्ट इंडिज आणि इंग्लंडलाच दोनदा ही ट्रॉफी जिंकता आली आहे. दरम्यान, आता पुढचा टी-२० वर्ल्डकप कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर जाणून घेऊया पुढचा वर्ल्डकप कोणत्या देशात रंगणार आहे.

भारतात होणार पुढचा टी-20 वर्ल्डकप

ICC दरवर्षी किमान एक ICC स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करते. शिवाय त्याचं वेळापत्रकही अशाच पद्धतीने बनवण्यात येतं. T20 विश्वचषक दर दोन वर्षांनी होतो. म्हणजेच पुढचा T20 विश्वचषक 2026 मध्ये असणार आहे. दुसरी आणि मोठी गोष्ट म्हणजे 2026 साली होणारा टी-20 वर्ल्डकप भारतात होणार आहे. याचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे असणार आहे. ही स्पर्धा अजून दूर असल्याने वेळापत्रकही आलेलं नाही, पण टीम इंडिया आपले सर्व सामने भारतातच खेळू शकेल असं मानलं जातंय. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ शकतो.

कोणत्या संघांचा असणार समावेश

आता या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या टीम बद्दल बोलायचं झालं तर त्यात भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीम यजमान असल्याने खेळणार. याशिवाय 2024 च्या T20 वर्ल्डकपमधील टॉप 7 संघांनीही यात प्रवेश केला आहे. म्हणजेच भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांचा त्यात समावेश आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीनुसार आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे संघही त्यात सामील आहेत. 

आता 8 टीम्सचं नाव फायनल होणं बाकी

एकूण 12 टीम्सने आधीच आपलं स्थान निश्चित केलंय. पण पुढचा टी-20 वर्ल्डकपमध्येही २० टीम्सचा समावेश असणार आहे. यामध्ये उर्वरित 8 टीम्सचा निर्णय होणं बाकी आहे. पूर्व आशिया पॅसिफिकमधील एक टीम, अमेरिका पात्रता फेरीतील एक टीम, आशिया पात्रता फेरीतील दोन टीम आणि आफ्रिकेतील आणखी दोन टीम्सचा समावेश असणार आहे, काही काळानंतर, आयसीसीद्वारे क्वालिफायर सामने आयोजित केले जाणार आहेत. ज्या टीम्स यामध्ये विजयी होतील, त्यांना पुढच्या वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळणार आहे.