...तेव्हा सचिन-द्रविड-कुंबळे-लक्ष्मणने दारू प्यायली, सेहवागचा खुलासा

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अनिल कुंबळे यांनी भारतीय ड्रेसिंग रुममधल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Updated: May 9, 2019, 09:07 PM IST
...तेव्हा सचिन-द्रविड-कुंबळे-लक्ष्मणने दारू प्यायली, सेहवागचा खुलासा title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अनिल कुंबळे यांनी भारतीय ड्रेसिंग रुममधल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विक्रम साठे यांच्या 'व्हॉट द डक' या कार्यक्रमात सेहवाग आणि कुंबळे आले होते. या कार्यक्रमात सेहवागने सचिन, द्रविड, कुंबळे आणि लक्ष्मण याने दारू प्यायल्याचा किस्सा सांगितला.

२००८ साली कुंबळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीमध्ये झालेली शेवटची टेस्ट मॅच खेळला होता. निवृत्ती घेतल्यानंतरही कुंबळे नागपूरमध्ये होणाऱ्या चौथ्या टेस्टसाठी टीमसोबत गेला होता. नागपूरमध्ये होणारी ती टेस्ट सौरव गांगुलीचीही शेवटची टेस्ट होती. या मॅचनंतर आम्ही जोरदार सेलिब्रेशन केल्याचं कुंबळेने सांगितलं.

'ती टेस्ट सौरव गांगुलीची शेवटची मॅच होती. तसंच लक्ष्मणनेही १०० टेस्ट खेळण्याचा विक्रम केला होता. सचिन तेंडुलकरनेही विक्रमाला गवसणी घातली होती आणि भारताने टेस्ट सीरिजही जिंकली होती. त्यामुळे आम्ही जंगी सेलिब्रेशन केलं', असं कुंबळे म्हणाला.

या कार्यक्रमात सेहवागने या सेलिब्रेशनचा खुलासा केला. 'याआधी कुंबळेने कधीही दारू प्यायली नव्हती. पण आम्ही सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि अनिल कुंबळे यांना टेबलवर उभं केलं आणि दारू प्यायला लावली,' असं वक्तव्य सेहवागने केलं.

'दारू प्यायल्यानंतर रात्री काय झालं ते मला आठवत नव्हतं. पण या सगळ्या सेलिब्रेशनचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. त्या रात्रीनंतर आम्ही ते रेकॉर्डिंग बघितलं', असं कुंबळे म्हणाला.

नागपूर टेस्टनंतर केलेलं सेलिब्रेशन २००७ टी-२० वर्ल्ड कप विजयाचं सेलिब्रेशन आणि २०११ वर्ल्ड कप विजयाच्या सेलिब्रेशनपेक्षा चांगलं होतं, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली आहे.