'हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का?'

महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.

Updated: Jul 23, 2017, 06:09 PM IST
'हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का?' title=

चंदीगढ : महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती. या खेळीमुळेच भारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता.

सेमी फायनलमध्ये केलेल्या या विक्रमी खेळीमुळे हरमनप्रीत क्रिकेट रसिकांच्या घराघरात पोहोचली. आता हरमनप्रीतवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे, पण सहा वर्षांपूर्वीची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी होती. सहावर्षांपूर्वी नोकरीची गरज असताना पंजाब पोलिसांकडून हरमनप्रीतची खिल्ली उडवण्यात आली होती.

पंजाब पोलिसांमध्ये नोकरी द्यायला हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का असा सवाल पंजाब पोलिसांमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं विचारला होता, अशी माहिती हरमनप्रीतचे प्रशिक्षक यादविंदरसिंह सोधी यांनी दिली आहे.

२००९ पासून हरमनप्रीत भारताकडून क्रिकेट खेळत आहे. २०१०-११मध्ये हरमनप्रीतला नोकरीची आवश्यकता होती. तेव्हा खेळाडूंसाठी असलेल्या कोट्यातून नोकरी मिळवण्यासाठी तिनं पंजाब पोलिसांकडे प्रयत्न केले. पण महिला क्रिकेटपटूला नोकरी देण्याची तरतूद नसल्याचं सांगत हरमनप्रीतला डावलण्यात आलं होतं.

सचिनमुळे मिळाली नोकरी

नोकरीसाठी खटपट करणाऱ्या हरमनप्रीतच्या मदतीला मग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर धावून आला होता. राज्यसभेचा खासदार असलेल्या सचिननं हरमनप्रीतच्या नावाची शिफारस रेल्वे मंत्रालयाला केली होती. यानंतर हरमनप्रीतला पश्चिम रेल्वेमध्ये नोकरी लागली होती. मागच्या चार वर्षांपासून हरमनप्रीत रेल्वेमध्ये काम करत आहे.