मुंबई : टीम इंडियाचं अवघ्या काही दिवसात नवीन मिशन सुरू होणार आहे, या आठवड्यात म्हणजेच 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होतेय. यूएईमध्ये होत असलेल्या या स्पर्धेसाठी टीम इंडिया रवाना होत असताना मोठा धक्का बसला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आता आशिया कपमध्ये ते टीम इंडियासोबत राहणं त्यांच्यासाठी कठीण आहे.
आशिया कपमध्ये 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाला पहिला सामना खेळावा लागणार आहे. अशा स्थितीत कोच म्हणून टीम इंडियासोबत आशिया कपला कोण जाणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.
राहुल द्रविड एकदा कोरोना निगेटिव्ह आला आणि तंदुरुस्त झाला की तो टीम इंडियात सामील होऊ शकेल, असं विधान बीसीसीआयकडून करण्यात आले आहे. मात्र जर राहुल द्रविड पोहोचू शकले नाहीत तर कोच पदाची धुरा कोणाकडे येणार हे पाहूयात.
राहुल द्रविड जेव्हापासून टीम इंडियाचा मुख्य कोच बनलाय तेव्हापासून एक नवीन गोष्ट पाहायला मिळतेय की, वेगवेगळ्या दौऱ्यांवर कर्णधार बदलतो. नुकतंच जेव्हा टीम इंडिया आयर्लंडला पोहोचली आणि आता झिम्बाब्वेला पोहोचली तेव्हा राहुल द्रविडने टीम इंडियासोबत नव्हते. यावेळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू VVS लक्ष्मण यांनी टीम इंडियासोबत कोच म्हणून काम केलं.
अशा परिस्थितीत आता हाच पर्याय आशिया कपमध्ये फॉलो होताना दिसणार आहे. राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह असल्याने केवळ व्हीव्हीएस लक्ष्मणच त्याची जागा भरून आशिया कपमध्ये टीम इंडियासोबत राहू शकतो. व्हीव्हीएस लक्ष्मणने आयपीएल आणि एनसीएमधील खेळाडूंसोबत काम केलंय, त्यामुळे कामंही सोप्प होणार आहे.