बंगळुरूच्या खराब कामगिरीनंतर विराटचा माफीनामा

विराट कोहलीच्या बंगळुरू टीमनं यंदाच्या आयपीएलमध्येही निराशाजनक कामगिरी केली.

Updated: May 24, 2018, 09:35 PM IST
बंगळुरूच्या खराब कामगिरीनंतर विराटचा माफीनामा title=

बंगळुरू : विराट कोहलीच्या बंगळुरू टीमनं यंदाच्या आयपीएलमध्येही निराशाजनक कामगिरी केली. मागच्या वर्षी बंगळुरूची टीम शेवटच्या क्रमांकावर होती तर यावर्षी त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. या खराब कामगिरीनंतर विराट कोहलीनं बंगळुरूच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. ट्विटरवर विराट कोहलीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही जिंकता किंवा तुम्ही शिकता, असं मला वाटतं. आम्ही लढलो आणि मैदानात सर्वोत्तम दिलं. पण पुढच्या मोसमामध्ये आम्ही पुनरागमन करू, असा संदेश विराटनं ट्विट करून दिला आहे. यावर्षी आमची कामगिरी अभिमान वाटेल अशी निश्चित झाली नाही. या कामगिरीनंतर आम्ही दु:खी आहोत. चाहत्यांची निराशा केल्यामुळे मी त्यांची माफी मागतो, असं विराट या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. आयुष्यात प्रत्येकवेळी तुम्हाला हवं तेच मिळत नाही. आत्तापर्यंत जसा पाठिंबा दिलात तसाच पुढच्या वर्षीही द्या, असं भावनिक आवाहन विराटनं केलं आहे. 

यावर्षी आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये बंगळुरूला प्रवेश मिळवता आलेला नाही. १४ पैकी ६ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला तर ८ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. १२ पॉईंट्ससह ते सहाव्या क्रमांकावर राहिले. कोहलीनं बंगळुरूकडून सर्वाधिक रन केल्या. १४ मॅचमध्ये ४८.१८ च्या सरासरीनं कोहलीनं ५३० रन केल्या.