'त्यावर आम्ही काहीच करू शकत नाही', पराभवानंतर विराटचं वक्तव्य

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १० विकेटने दारुण पराभव झाला आहे.

Updated: Feb 24, 2020, 06:40 PM IST
'त्यावर आम्ही काहीच करू शकत नाही', पराभवानंतर विराटचं वक्तव्य title=

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १० विकेटने दारुण पराभव झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला भारताचा हा पहिलाच पराभव आहे. तरीही भारत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारतीय टीमचा या मॅचमध्ये एकतरफी पराभव झाल्याचं कर्णधार विराट कोहलीने मान्य केलं आहे. तसंच लोकं या पराभवाला जेवढा मोठा मानत आहेत, तेवढा हा मोठा पराभव नाही, असं विराटला वाटत आहे.

'या मॅचमध्ये आम्ही स्पर्धाच दाखवली नाही. याआधीच्या मॅचमध्ये आमचा पराभव झाला होता, तरी आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो होतो, आणि प्रत्येकवेळी आम्ही मॅचमध्ये असायचो. यावेळी मात्र पहिल्याच इनिंगमध्ये बॅट्समननी निराशा केली', असं विराट म्हणाला.

न्यूझीलंडने या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर १६५ रनमध्येच भारताचा ऑल आऊट झाला. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये ३४८ रन केल्यामुळे त्यांना १८३ रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने १९१ रनच केल्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी फक्त ९ रनचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

'आम्ही या मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली नाही, हे कबूल करण्यात मला कोणतीही अडचण नाही. आम्ही जेव्हा हे मान्य करु तेव्हा पुढच्या मॅचमध्ये आम्ही चांगल्या मानसिकतेमध्ये मैदानात उतरु,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

'आम्ही चांगलं खेळलो नाही, हे आम्हालाही माहिती आहे, पण जर लोकं हे वाढवून सांगत असतील तर आम्ही काहीही करु शकत नाही. जगाचा अंत झाला आहे, असं या पराभवाला का बघितलं जात आहे, हे माझ्या लक्षात येत नाही. काही लोकांसाठी हे जग संपल्यासारखं असू शकेल, पण वास्तवात तसं नाहीये. आमच्यासाठी हा क्रिकेटचा खेळ आहे, जो आम्ही हरलो. आता आम्हाला पुढे जावं लागेल,' असं विराटने सांगितलं.