विराट-रोहितचं शतक, भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकामुळे भारतानं पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे.

Updated: Oct 21, 2018, 09:07 PM IST
विराट-रोहितचं शतक, भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा  title=

गुवाहाटी : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकामुळे भारतानं पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. गुवाहाटीमध्ये झालेली ही वनडे भारतानं ८ विकेटनं जिंकली आहे. वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या ३२३ रनचा पाठलाग भारतानं ४२.१ ओव्हरमध्ये केला. रोहित शर्मानं ११७ बॉलमध्ये नाबाद १५२ रन केले. तर कर्णधार विराट कोहलीनं १०७ बॉलमध्ये १४० रन केले. विराटचं वनडेमधलं हे ३६वं शतक तर रोहितचं २०वं शतक होतं.

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. ५० ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजनं ८ विकेट गमावून ३२२ रन केले. वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमेयरचं शतक आणि ओपनर किरन पॉवेलच्या अर्धशतकामुळे वेस्ट इंडिजनं या धावसंख्येपर्यंत मजल मारली. शिमरोन हेटमेयरनं ७८ बॉलमध्ये १०६ रनची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ६ फोरचा समावेश होता. तर ओपनर किरन पॉवेलनं ३९ बॉलमध्ये ५१ रन केले. पॉवेलनं २ सिक्स आणि ६ फोर मारले.

सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं ३८, नवव्या क्रमांकाच्या बिशूनं नाबाद २२ आणि दहाव्या क्रमांक्चाय केमार रोचनं नाबाद २६ रन केले. तळाच्या या बॅट्समनमुळे वेस्ट इंडिजला सन्मानपूर्वक स्कोअरपर्यंत पोहोचता आलं.

भारताकडून लेग स्पिनर युझवेंद्र चहलनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला २-२ विकेट मिळवण्यात यश आलं. खलील अहमदला १ विकेट मिळाली.

रेकॉर्डचा पाऊस

विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ३६वं शतक आहे. वनडेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक ४९ शतकांची नोंद आहे. १०७ बॉलमध्ये १४० रनची खेळी करून विराट कोहली आऊट झाला. विराटच्या खेळीमध्ये २१ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.

रनचा पाठलाग करताना विराटचं हे २२वं शतक आहे. तर घरच्या मैदानातलं १५वं, कर्णधार म्हणून १४वं आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ५वं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय खेळाडूही विराट बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकरनं वनडेमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक ४ शतकं केली होती.

कर्णधार असताना सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू

रिकी पाँटिंग- २२

विराट कोहली- १४

एबी डिव्हिलियर्स- १३

सौरव गांगुली- ११

सनथ जयसूर्या- १०

रोहितनंही केली रेकॉर्ड

रोहित शर्माचं हे वनडेमधलं २०वं शतक आहे. या शतकाबरोबरच रोहित शर्मा दिग्गजांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे. क्रिकेट खेळणाऱ्या १० सगळ्यात जुन्या देशांविरुद्ध शतक करण्याचा विक्रम रोहित शर्मानं केला आहे. हे रेकॉर्ड करणारा रोहित १०वा खेळाडू बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, हर्शल गिब्स, हशीम आमला, विराट कोहली, रॉस टेलर, एबी डिव्हिलियर्स, मार्टिन गुप्टील, उपुल थरंगा या खेळाडूंनी हा विक्रम केला होता.

एकाच वनडेमध्ये दोन शतकं करणाऱ्या जोड्या

एकाच वनडेमध्ये शतक करणाऱ्यांच्या यादीमध्ये विराट आणि रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. एबी डिव्हिलियर्स आणि हशीम आमलानं ५ वेळा, सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीनं ४ वेळा, हशीम आमला-क्विंटन डी कॉकनं ४ वेळा आणि रोहित शर्मा-विराटनं ४ वेळा एकाच मॅचमध्ये शतकं केली आहेत.

विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये २४६ रनची पार्टनरशीप झाली. वनडेमध्ये रनचा पाठलाग करताना ही दुसरी सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. रनचा पाठलाग करताना सर्वात मोठी पार्टनरशीप करण्याचं रेकॉर्ड रिकी पाँटिंग आणि शेन वॉटसनच्या नावावर आहे. २००९ साली सेंच्युरियनच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये वॉटसन आणि पाँटिंगमध्ये नाबाद २५२ रनची पार्टनरशीप झाली होती.

रनचा पाठलाग करताना झालेली ही भारतीय खेळाडूंची सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. याआधी श्रीलंकेविरुद्ध २००९ साली गौतम गंभीर-विराट कोहलीनं २२४ रनची, १९९७ साली श्रीलंकेविरुद्धच मोहम्मद अजहरुद्दीन-अजय जडेजाची २२३ रनची पार्टनरशीप झाली होती.