'किंग कोहली'ने या भीतीने सोडलं टीम इंडियाचं कर्णधारपद?

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं.

Updated: Jan 17, 2022, 08:41 AM IST
'किंग कोहली'ने या भीतीने सोडलं टीम इंडियाचं कर्णधारपद? title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं. कॅप्टन्सीवरून पाय उतार होत कोहलीने चाहत्यांना मोठा धक्का दिला. विराट कोहलीने ट्विटरवर त्याचा हा निर्णय जाहीर केला. यावर माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीने भारताचे कसोटी कर्णधारपद सोडण्यामागचं कारणं सांगताना संजय मांजरेकर म्हणाले की, "दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर त्याला कर्णधारपद गमावण्याची भीती होती." केपटाऊनमधील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 1-2 ने गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

विराटची जबाबदारी लवकर संपली

विराट कोहलीने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक खेळाडूंनी आणि माजी क्रिकेटपटूंनी कसोटी टीमला नव्या उंचीवर नेण्यासाठी कोहलीचं अभिनंदन केलं. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, कोहलीचा कर्णधार म्हणून कार्यकाळ सर्व फॉरमॅटमध्ये खूप लवकर संपल्याचं मला वाटतं.

भीतीने सोडलं कर्णधारपद?

संजय मांजरेकर पुढे म्हणाले, विराट कोहलीला कोणीही कर्णधारपदावरून काढून टाकावं असं वाटत नाही. मला वाटतं की त्याला कर्णधार म्हणून स्वत:ला कोणत्याही प्रकारे वाईट सिद्ध होताना पाहायचं नव्हतं. त्यामुळे आता आपलं कर्णधारपद धोक्यात आल्याचं जेव्हा त्याला वाटले तेव्हा त्याने स्वतःच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

विराटच्या निर्णयाने हैराण

संजय मांजरेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे, "टी-20चं कर्णधारपद आणि आयपीएलचं कर्णधारपद त्याने सोडलं होतं. मात्र मला आश्चर्य आहे की तिन्ही फॉरमॅटमध्ये एकापाठोपाठ एक इतक्या झटपट त्याने राजीनामे दिले."