हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटनी विजय झाला. केदार जाधव आणि महेंद्र सिंह धोनी या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच चौथ्या विकेटसाठी या दोघांमध्ये नाबाद १४१ रनांची भागीदारी झाली. या मॅचमध्ये कॅप्टन कोहलीने देखील ४४ रन केल्या. पण त्याला मोठी खेळी करण्यास अपयश आले. असे असले तरी देखील कोहलीच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे.
विराटच्या नावे कर्णधार म्हणून हा विक्रम झाला आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत ६४ मॅचपैकी ४८ वनडे मॅच जिंकल्या आहेत. या सोबतच विराटने वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू विवियन रिचर्डसन यांना मागे टाकलं आहे. कर्णधार म्हणून विवयन रिचर्डसन यांनी आपल्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला ४७ मॅचमध्ये विजय मिळवून देण्याची कामगिरी केली होती. शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला विजय हा कोहलीचा कर्णधार म्हणून ४८ वा विजय ठरला.
६४ वनडे मॅचनंतर सर्वाधिक वनडे जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर आहे. रिकी पाँटिंगनं कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या ६४ वनडेपैकी ५१ मॅच जिंकल्या होत्या. तर वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉईड यांनी पहिल्या ६४ वनडेपैकी ५० वनडेमध्ये विजय मिळवला होता. या यादीमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.