मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रोहित शर्मा शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला. बीसीसीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कोरोनामुळे इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याची शक्यता आहे.
इंग्लंडविरूद्धची पहिली टेस्ट टीम इंडियाला रोहितविनाच खेळावी लागणार आहे. त्यामुळे आता टीमच्या कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होतोय. अशावेळी ऋषभ पंत आणि विराट कोहलीची नावं चर्चेत आहेत. अधिककरून टीमचं नेतृत्व पंतकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.
भारत विरूद्ध इंग्लंड दौऱ्याच्यापूर्वी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला देखील कोरोनाची लागण झाली होती. शिवाय विराटलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. अशावेळी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवण्याचा विचार केला नाही.
दरम्यान यावेळी इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसले होते. या दोघांनीही फॅन्ससोबत सेल्फीही घेतला होता. यावरून बीसीसीआयने नाराजीही व्यक्त केली होती. तर आता टेस्ट सामना तोंडावर असताना रोहित शर्मा कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
बायो बबलमध्ये खेळाडूंना भेटणारे सर्व सदस्य बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात येत नाहीत. त्यांच्या जवळ येणारी प्रत्येक गोष्ट सॅनियाइज केली जाते. यामुळे कोरोनाचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. यामध्ये ग्रुपचा कोणताही सदस्य बाहेरील लोकांच्या संपर्कात येत नाही.