शून्यावर आऊट झाल्यावरही कोहलीनं बनवलं हे रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारताची बॅटिंग सपशेल अपयशी ठरली.

Updated: Oct 10, 2017, 10:06 PM IST
शून्यावर आऊट झाल्यावरही कोहलीनं बनवलं हे रेकॉर्ड title=

गुवाहाटी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारताची बॅटिंग सपशेल अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाच्या बेहरेनडॉर्फनं भारताच्या ४ बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बेहरेनडॉर्फनं त्याच्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये ४ विकेट घेतल्या. यातली सगळ्यात महत्त्वाची विकेट होती विराट कोहलीची. या मॅचमध्ये विराट कोहली दुसऱ्या बॉलवर शून्यवर आऊट झाला. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये विराट कोहली पहिल्यांदाच शून्यवर आऊट झाला.

विराट कोहलीनं आत्तापर्यंत ५२ टी-20 मॅच खेळल्या आहेत. या मॅचआधी कोहलीनं लागोपाठ ४८ मॅचमध्ये बॅटिंग केली होती, पण तो एकदाही शून्यवर आऊट झाला नव्हता. एवढ्या इनिंगनंतर शून्यवर आऊट होणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

विराटच्या आधी हे रेकॉर्ड पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर होतं. मलिक लागोपाठ ३९ इनिंग खेळून एकदाही शून्यवर आऊट झाला नव्हता, पण ४०व्या इनिंगमध्ये मलिक शून्यवर आऊट झाला. या यादीमध्ये भारताचा युवराज सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. युवराज ३९व्या इनिंगमध्ये शून्यवर आऊट झाला होता.

आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये विराट कोहली पहिल्यांदाच शून्यवर आऊट झाला असला तरी आयपीएलमध्ये तो सातवेळा एकही रन न बनवता आऊट झाला आहे. आत्तापर्यंतच्या १० आयपीएल सिझनमध्ये विराट रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळला आहे.