डिविलियर्स, विराटला अश्रू अनावर; ढसाढसा रडला RCB चा कर्णधार

स्वप्नभंग झाला आणि.... 

Updated: Oct 12, 2021, 11:46 AM IST
डिविलियर्स, विराटला अश्रू अनावर; ढसाढसा रडला RCB चा कर्णधार  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : बंगळुरूच्या संघानं यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करावी असं अनेक क्रीडारसिकांचं स्वप्न होतं. संघ चांगली कामगिरी करत असतानाच एक वळण असं आलं जेव्हा आरसीबीच्या संघाला आयपीएलमधून रित्या हातानंच माघारी फिरावं लागलं. कोलकाताच्या संघानं एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा पराभव करत विराटचा स्वप्नभंग केला.

कर्णधार म्हणून संघाला आयपीएलचं जेतेपद मिळवून देण्याचं विराटचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आयपीएलमध्ये त्याची कर्णधार म्हणून असणारी कारकिर्द एका अर्थी अपयशाच्या वळणावर येऊन थांबली आणि या साऱ्याचं दु:ख विराटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागलं होतं. सामना संपल्यानंतर इतर खेळाडूंशी संवाद साधत असताना विराट ढसाढसा रडला. यावेळी ए बी डिविलियर्सलाही त्याचे अश्रू रोखता आले नाहीत.

वडिलांच्या निधनानंतरही विराटनं स्वत:ला सावरत खेळावर लक्ष केंद्रीत केलं होतं. पण, एका स्वप्नाचा पाठलाग करत अखेर हाती आलेल्या अपयशामुळं मात्र तो खचलेला दिसला. एका खेळाडूची ही अवस्था पाहून क्रीडारसिकांच्याही मनाला चटका लागला. ज्यानंतर सोशल मीडियावर विराटसाठी अनेकांनी आधार देणाऱ्या पोस्ट लिहित त्याच्यातल्या खेळाडूचा सन्मान केला.

सामन्यात नेमकं काय घडलं?

 बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 6 विकेट्स  गमावून 2 चेंडूंआधी पूर्ण केलं. (ipl eliminator 2021 rcb vs kkr Kolkata Knight Riders beat royals chalengers banglore by 4 wickets at  Sharjah Cricket Stadium)

कोलकाताकडून शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात मिळवून दिली. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली. शुबमनने 29 तर व्यंकटेशने  26 धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीने निराशा केली. तो 6 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर मीडल ऑर्डरमध्ये नितीश राणाने 23 धावा केल्या.