भारताचा कर्णधार-उपकर्णधार आज आमने-सामने, मुंबई पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

मुंबई विरुद्ध बंगळुरच्या टी-20 मॅचला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.

Updated: Apr 17, 2018, 06:13 PM IST
भारताचा कर्णधार-उपकर्णधार आज आमने-सामने, मुंबई पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत title=

मुंबई : मुंबई विरुद्ध बंगळुरच्या टी-20 मॅचला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. हा सामना म्हणजे भारताचा कर्णधार विरुद्ध भारताचा उपकर्णधार असा असणार आहे. विराट कोहलीकडे बंगळुरचं तर रोहित शर्माकडे मुंबईच्या टीमचं नेतृत्व आहे. सुरुवातीच्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता मंगळवारी मुंबईचा सामना विराट कोहलीच्या बंगळुरूशी होणार आहे. या मॅचमध्ये जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अंक मिळवण्याचं आव्हान मुंबईच्या टीमपुढे असणार आहे. मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबईनं तिन्ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये हरल्या.

बंगळुरुचीही सुरुवात खराब

मुंबईप्रमाणेच या स्पर्धेमध्ये बंगळुरुचीही सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. बंगळुरूनं त्यांच्या तीनपैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे. मुंबई आणि बंगळुरुच्या टीममध्ये आक्रमक बॅट्समन आहेत.

मुंबईला चिंता बॉलिंगची

मुंबईच्या टीमनं तिन्ही मॅचमध्ये स्कोअर केला होता पण बॉलरनी मोक्याच्या क्षणी रन दिल्यामुळे मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या तिन्ही मॅचमध्ये रोहित शर्मानं एकदाही टॉस जिंकला नाही. वानखेडे स्टेडियमवर लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं जात असल्याचं मागच्या काही वर्षांच्या सामन्यांमधून दिसून आलं आहे.

मुंबईच्या टीममध्ये अॅडम मिलने

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला दुखापत झाल्यामुळे मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला होता. आता पॅट कमिन्सऐवजी मुंबईनं नव्या खेळाडूची निवड केली आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर अॅडम मिलनेला मुंबईच्या टीममध्ये घेण्यात आलं आहे. मिलनेनं आत्तापर्यंत ४० वनडे आणि १९ टी-20 मॅच खेळल्या आहेत. मिलने याआधी बंगळुरुकडून खेळला होता.