तारीख पे तारीख! Vinesh Phogat ला न्याय मिळणार कधी? आता 'या' दिवशी लागणार निकाल

Vinesh Phogat Medal Case : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवर आता 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजतेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे.

सौरभ तळेकर | Updated: Aug 13, 2024, 10:35 PM IST
तारीख पे तारीख! Vinesh Phogat ला न्याय मिळणार कधी? आता 'या' दिवशी लागणार निकाल title=
Vinesh Phogat Silver Medal Case

Vinesh Phogat CAS Hearing Verdict : विनेश फोगाटच्या याचिकेवर निर्णय होण्याची वाट प्रत्येक भारतीय पाहत असताना आता पुन्हा नवी तारीख देण्यात आली आहे. क्रीडा न्यायालय आता16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता निकाल देणार आहे. विनेश फोगटला रौप्यपदक द्यायचं की नाही याचा निर्णय क्रीडा न्यायालयाने घ्यायचा आहे. मात्र, निकाल देण्यात विलंब होत असल्याने भारतीय चाहत्यांचा संताप अनावर होताना दिसतोय. 10 ऑगस्ट रोजी निकाल लागेल, अशी शक्यता होती. त्यानंतर आजची तारीख देण्यात आली होती. पण आता 16 ऑगस्टची तारीख देण्यात आली आहे.

विनेश फोगाट हीचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचं स्पष्ट झाल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर विनेशनं क्रीडा लवादाकडं धाव घेतली होती. यावर दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाल्यानं लवादनं हा निकाल राखून ठेवला होता. त्याचा निकाल कधी लागतोय? याची प्रतिक्षाच आता करावी लागणार आहे.

आत्तापर्यंत काय काय झालं?

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. क्रीडा लवादाने कुस्तीपटू विनेश फोगाटची अपील स्वीकारली अन् तिचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर क्रिडा लवादाने हा निर्णय दिला आहे. तसेच जागतिक कुस्ती महासंघ आणि ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आव्हान देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील समोर होती.

विनेश फोगाटने याआधी क्रिडा लवादाकडे फायनल थांबवावी, अशी अपिल केली होती. मात्र, लवादाने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विनेशला रौप्य पदक देण्यात यावं, अशी विनंती लवादाकडे करण्यात आली. या विषयावर मत मांडण्यासाठी विनेशला अनुमती दिली होती. त्यामुळे विनेशला मोठा दिलासा मिळाला होता. 

विनेशच्या वतीनं दुसऱ्या याचिकेमध्ये रौप्य पदकाची मागणी करण्यात आली होती. ज्यावर CAS कडून या प्रकरणी विचारपूर्वक निर्णय देण्याचे संकेत देण्यात आले. ज्यानंतर लगेचच विनेशची बाजू मांडण्यासाठी वकीलांशी शोधाशोध सुरू झाली आणि हरीश साळवे यांच्यापाशी येऊन हा शोध संपला. हरीश साळवे यांनी आतापर्यंत अनेक कायदेशीर संघर्षांचा निकाल आपल्या बाजूनं अतिशय प्रभावीरित्या वळवण्याची किमया केल्यामुळं सर्वांच्या नजरा निर्णयावर होत्या.