भारताच्या टॉपच्या कुस्तीपटूंवर रात्री फुटपाथवर झोपण्याची वेळ, फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Wrestlers Protest: ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे (Wrestling Federation of India) प्रमुख बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार हाती घेतलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 25, 2023, 06:35 PM IST
भारताच्या टॉपच्या कुस्तीपटूंवर रात्री फुटपाथवर झोपण्याची वेळ, फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील title=

Wrestlers Protest: ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे (Wrestling Federation of India) प्रमुख बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटू पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. दिल्लीमधील जंतर मंतर येथे कुस्तीपटू आंदोलन करत असून समितीने केलेल्या तपासात काय समोर आलं हे उघड करण्याची मागणी केलीआहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये भारतातील अनेक मोठे कुस्तीपटू सहभागी आहेत. 

साक्षी मलिक, रवी दाहिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी जानेवारी महिन्यात महिला कुस्तीपटूंचं बृजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक शोषण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर त्यांनी तीन दिवस सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलं होतं. 

दरम्यान सध्या सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक कुस्तीपटू भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विनेश फोगाटच्या डोळ्यातून पाणी वाहतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दुसरीकडे जंतर मंतरवर आंदोलन करणारे सर्व कुस्तीपटू रात्रीच्या वेळी फुटपाथवरच झोपत आहे. विनेश फोगाटने ट्विटरला त्यांचा फोटो शेअर केला आहे. "पोडियम ते फूटपाथ! मध्यरात्री मोकळ्या आकाशाच्या खाली न्यायाच्या आशेत," असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

अनुराग ठाकूर या आरोपांची चौकशी करण्यासाठी बॉक्सर एमसी मेरी कॉमच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निरीक्षण समितीची घोषणा केली होती. मेरी कोम व्यतिरिक्त, या समितीत ऑलिम्पिक पदक विजेता-कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी बॅडमिंटनपटू आणि मिशन ऑलिम्पिक सेल सदस्य तृप्ती मुरगुंडे, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमचे माजी सीईओ राजेश राजगोपालन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे माजी कार्यकारी संचालक (संघ) राधिका श्रीमन आहेत. 

विनेश फोगाटने महिन्याच्या सुरुवातीला आपण बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. आमचा समितीवरील विश्वास आता कायम राहिलेला नाही असं तिने सांगितलं होतं. "आम्हाला सरकारकडून काही आश्वासनं मिळाली होती. पण ती पूर्ण झालेला नाही. समितीने दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्टबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही," असं तिने म्हटलं. 

"समितीने अहवाल सादर करण्यासाठी नेमका किती वेळ लागणार आहे? तीन महिने पूर्ण झालेले असून आम्हाला अद्यापही काही माहिती मिळालेली नाही. तक्रार दाखल करणाऱ्या मुलींचा मृत्यू झाल्यानंतर हा रिपोर्ट बाहेर येणार का?," अशी विचारणा विनेश फोगाटने केली आहे. 

"समितीचा अहवाल सादर करा असं सरकारला वारंवार सांगून आता आम्हाला कंटाळा आला आहे. आम्हाला रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणूक प्रक्रियेशी काही देणं-घेणं नाही. आम्हाला आमच्या करिअरची जास्त चिंता आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी आमच्यावर मदार असून आम्हालाही लवकरात लवकर तयारी सुरु करायची आहे," असं विनेश फोगाटने सांगितलं आहे. तर साक्षी मलिकने न्याय मिळेपर्यंत लढा बंद होणार नाही असा इशारा दिला आहे.